YouTube Premium : जगभरात लोकप्रिय असलेल्या व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म YouTube ने आपल्या मोफत वापरकर्त्यांच्या अडचणीत वाढ करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत आहे. जाहिरातींनंतर आता YouTube आपल्या अत्यंत महत्त्वाच्या आणि वापरकर्त्यांच्या पसंतीच्या 'प्लेबॅक स्पीड' (Playback Speed) या वैशिष्ट्यावर गदा आणण्याच्या तयारीत आहे. लवकरच हे वैशिष्ट्य केवळ 'प्रीमियम सबस्क्रिप्शन' घेतलेल्या वापरकर्त्यांसाठीच मर्यादित केले जाऊ शकते.
काय आहे नवा बदल? (YouTube Playback Speed Restriction)
सध्या YouTube वरील कोणताही व्हिडिओ आपण मोफत वेगाने (उदा. 1.5x किंवा 2.0x) पाहू शकतो. मात्र, रेडिट (Reddit) वरील एका पोस्टनुसार, YouTube या फिचरला 'प्रीमियम-ओन्ली' करण्याचा प्रयोग करत आहे. रील्स आणि शॉर्ट्सच्या युगात वेळ वाचवण्यासाठी अनेक जण मोठे व्हिडिओ अधिक वेगाने पाहणे पसंत करतात. जर हा बदल कायमस्वरूपी लागू झाला, तर मोफत वापरकर्त्यांना व्हिडिओचा वेग वाढवण्याचा पर्याय गमवावा लागू शकतो.
गट 'अ' आणि 'ब' वर गुप्त चाचणी सुरू
YouTube सध्या या बदलाची थेट अंमलबजावणी न करता प्रायोगिक तत्त्वावर चाचणी करत आहे. यासाठी वापरकर्त्यांना दोन गटात विभागले गेले आहे:
गट अ: या गटातील वापरकर्त्यांना अद्यापही प्लेबॅक स्पीडचे वैशिष्ट्य मोफत मिळत आहे.
गट ब: या गटातील वापरकर्त्यांसाठी हा पर्याय लॉक करण्यात आला असून, तो वापरण्यासाठी प्रीमियम सबस्क्रिप्शन घेण्याची सूचना दिली जात आहे. एका वापरकर्त्याने दावा केला आहे की, त्याच्या एका खात्यावर हे फिचर मोफत दिसत आहे, तर दुसऱ्या खात्यावर त्यासाठी शुल्क मागितले जात आहे.
हेही वाचा - WhatsApp Paid Version: आता व्हॉट्सॲप वापरण्यासाठी पैसे मोजावे लागणार? नेमका काय आहे सबस्क्रिप्शन प्लॅन? जाणून घ्या
मोफत वापरकर्त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न
गेल्या काही काळापासून YouTube आपल्या मोफत वापरकर्त्यांना सशुल्क प्रीमियम (Paid Subscription) कडे वळवण्यासाठी विविध प्रयत्न करत आहे. कधी जाहिरातींची संख्या वाढवून तर कधी 'हाय-डेफिनिशन' व्हिडिओसाठी निर्बंध घालून वापरकर्त्यांना प्रीमियम घेण्यास भाग पाडले जात आहे. सध्या भारतात वैयक्तिक YouTube प्रीमियम सबस्क्रिप्शनची किंमत सुमारे 149 प्रति महिना आहे. गेल्या वर्षी कंपनीने काही मर्यादांसह एक स्वस्त प्लॅन देखील सादर केला होता.
तुम्हाला प्रीमियम घ्यावा लागेल का?
सध्या तरी ही केवळ एक चाचणी आहे. जर तुम्ही YouTube च्या या चाचणी गटात (B Group) नसाल, तर तुम्हाला सध्या तरी पैसे देण्याची गरज नाही. YouTube अनेकदा अशा चाचण्या करते आणि वापरकर्त्यांचा प्रतिसाद नकारात्मक मिळाल्यास ते वैशिष्ट्य पुन्हा मोफत केले जाते. मात्र, जर तुम्ही वेळ वाचवण्यासाठी व्हिडिओ फास्ट-फॉरवर्ड करून पाहणारे असाल आणि तुमच्या खात्यावर हा बदल दिसू लागला, तर मात्र तुम्हाला खिशाला कात्री लावावी लागेल.