मुख्यमंत्री फडणवीसांच्या नावाचा वापर करून कोट्यवधींची फसवणूक! मुंबई पोलिसांकडून भामट्याला अटक; नेमकं प्रकरण काय?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा OSD असल्याचे भासवून कंत्राटदाराची 3.25 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आसिफ पठाणला मुंबईतील मरीन ड्राइव्ह पोलिसांनी अटक केली आहे.

मुख्यमंत्री फडणवीसांच्या नावाचा वापर करून कोट्यवधींची फसवणूक! मुंबई पोलिसांकडून भामट्याला अटक; नेमकं प्रकरण काय?

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विशेष कार्य अधिकारी (OSD) असल्याचे भासवून एका कंत्राटदाराकडून तब्बल ३ कोटी २५ लाख रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत उघडकीस आला आहे. सरकारी खात्यातील प्रलंबित बिलांना मंजुरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत आरोपीने ही रक्कम घेतल्याचा आरोप आहे. एवढे पैसे मिळाल्यानंतरही आरोपीने आणखी ७५ लाख रुपयांची मागणी केली. या प्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथील ४० वर्षीय आसिफ इस्माईल पठाण याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोल्यातील ओबेरॉय कन्स्ट्रक्शनचे कंत्राटदार रणजीतसिंग ओबेरॉय यांची या प्रकरणात फसवणूक झाली आहे. त्यांच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे (PWD) सुमारे ५० कोटी रुपयांची बिले प्रलंबित होती. ही बिले मंजूर करून देण्यासाठी मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी आपले संबंध असल्याचे आरोपीने भासवले. तसेच आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा OSD असल्याची बतावणी करून कंत्राटदाराचा विश्वास संपादन केला.

प्रलंबित बिलांची मंजुरी मिळवून देण्यासाठी कमिशन द्यावे लागेल, असे सांगत आरोपीने टप्प्याटप्प्याने ३.२५ कोटी रुपये घेतल्याचा आरोप आहे. यातील १.२५ कोटी रुपये स्वीकारण्यासाठी १० सप्टेंबर रोजी कंत्राटदाराला मुंबईत बोलावण्यात आले होते. यावेळी आरोपीच्या कथित साथीदारामार्फत ही रक्कम स्वीकारण्यात आली.

दरम्यान, एवढी मोठी रक्कम दिल्यानंतरही आरोपीने आणखी ७५ लाख रुपयांची मागणी केली. त्यामुळे कंत्राटदाराला संशय आला. त्यांनी ३० सप्टेंबर रोजी मंत्रालयात जाऊन संबंधित व्यक्तीबाबत चौकशी केली. त्यावेळी आसिफ पठाण हा मंत्रालयातील कोणताही सरकारी अधिकारी नसल्याचे स्पष्ट झाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर रणजीतसिंग ओबेरॉय यांनी मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू करून आसिफ इस्माईल पठाण याला अटक केली. आरोपीला न्यायालयात हजर केले असता ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा पोलीस तपास करत आहेत. आरोपीने घेतलेली रक्कम कुठे ठेवली आहे, तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेले वाहन जप्त करण्यासाठीही तपास सुरू आहे. याशिवाय, अशाच प्रकारे इतर कंत्राटदारांनाही सरकारी अधिकारी असल्याचे भासवून फसवण्यात आले आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातील अधिकारी असल्याचे भासवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्याचा हा प्रकार चर्चेचा विषय ठरला आहे. दरम्यान, आरोपीवरील आरोपांची सत्यता न्यायालयीन प्रक्रियेत निश्चित होणार आहे.

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number