महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी, राजकारण, गुन्हेगारी, हवामान, वाहतूक, स्थानिक घटना आणि महत्त्वाच्या घडामोडींचे प्रत्येक अपडेट मिळवा एकाच ठिकाणी. राज्याच्या कानाकोपऱ्यात कुठे काय घडतंय, जाणून घ्या सर्व महत्त्वाच्या बातम्या आणि लाईव्ह अपडेट्ससह.

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update
live update maharashtra

LIVE NEWS & UPDATES

  • 03 Nov 2026 06:36 AM (IST)

    मालाडमध्ये लाकडाच्या गोदामाला भीषण आग; परिसरात खळबळ, सुदैवाने जीवितहानी नाही!

    मुंबईतील मालाड पश्चिम परिसरात सोमवारी रात्री लाकडाच्या गोदामाला आग लागल्याची घटना घडली. मालाडमधील आनंद रोडवरील रुईया वुड वेअरहाऊसमध्ये रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. रुईया मॅरेज हॉल आणि वल्लभदास नागराज शाळेजवळ असलेल्या दोन मजली इमारतीच्या तळमजल्यावर हे गोदाम आहे. गोदामात मोठ्या प्रमाणात लाकडी फळ्या आणि कार्डबोर्डचा साठा असल्याने आगीने पेट घेतला.

  • 03 Nov 2026 06:26 AM (IST)

    हिंगोलीच्या आरोग्य उपकेंद्रांवरील गैरहजेरीचा मुद्दा आरोग्यमंत्र्यांकडे

    हिंगोली जिल्ह्यातील आरोग्य उपकेंद्रांवर समुदाय आरोग्य अधिकारी अर्थात CHO तब्बल १५-१५ दिवस अनुपस्थित राहत असल्याची तक्रार आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते मुनीर पठाण यांनी संवाद यात्रेदरम्यान आरोग्यमंत्र्यांची भेट घेऊन ग्रामीण भागातील आरोग्यसेवेचा प्रश्न मांडला. या तक्रारीची गंभीर दखल घेत आरोग्यमंत्र्यांनी छत्रपती संभाजीनगरच्या आरोग्य उपसंचालिका वानेरे यांना तातडीने चौकशी करून आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश दिले. आता या चौकशीतून नेमके काय समोर येते आणि दोषींवर काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे.

  • 03 Nov 2026 06:26 AM (IST)

    अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीत ९९.२७ टक्के मतदान, पाच तालुक्यात १०० टक्के तर राहुरीत तुलनेने कमी मतदान

    अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या १० जागांसाठी १४ तालुक्यांतील ३३ केंद्रांवर ९९.२७ टक्के मतदान शांततेत पार पडले. पाच तालुक्यांत शंभर टक्के, तर राहुरीत सर्वात कमी मतदान झाले. बँकेच्या २१ पैकी ११ जागा बिनविरोध झाल्या असून, १० जागांसाठी सहकार आणि परिवर्तन पॅनलमध्ये चुरशीची लढत आहे. सकाळी ९ वाजेपासून मतमोजणी सुरू होत असून, १४ तालुक्यांसाठी १४ टेबल्सची व्यवस्था केली आहे. पारदर्शकतेसाठी सीसीटीव्ही, व्हिडिओ शूटिंग आणि कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. उमेदवारांच्या प्रतिनिधींसमक्ष मतमोजणी होणार असून, या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

  • 03 Nov 2026 06:24 AM (IST)

    कोकणात भाताच्या मळणीला सुरुवात; उत्पादन निम्म्यावर, बळीराजा आर्थिक संकटात

    कोकणातील मुख्य पीक असलेल्या भाताच्या मळणीला आता सुरुवात झाली आहे. मात्र, यंदा कमी पावसाचा मोठा फटका भात उत्पादनाला बसला असून, उत्पादनात निम्म्याने घट झाली आहे. भाताच्या लोंब्यांमध्ये दाण्यांचे प्रमाण कमी आणि अनेक ठिकाणी अर्धे पोळ असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. घरापर्यंत भात नेण्याऐवजी शेताच्या बांधावरच मळणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. लागवडीपासून कापणीपर्यंत केलेला खर्चही वसूल होत नसल्याने कोकणातील बळीराजा हवालदिल झाला आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number