महाराष्ट्रात ऑक्टोबर महिन्यात कडाक्याच्या उन्हाचे चटके अनुभवायला मिळणार आहेत. गुजरात परिसरात प्रतिचक्रवाताची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे गुजरातकडून महाराष्ट्राच्या काही भागांत येणारे कोरडे आणि उष्ण वारे तापमान वाढण्यामागचं कारण ठरु शकतात. यावेळी राज्यातील काही जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाने राज्यातील काही ठिकाणी उष्ण आणि दमट हवामानाचा, तर काही भागांत हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
दरम्यान मुंबई, ठाणे, पालघर आणि पनवेलमध्ये तापमानापेक्षा दमट हवामानामुळे अधिक अस्वस्थता जाणवण्याची शक्यता आहे. विशेषतः कोकणात आसपासच्या किनारपट्टीच्या भागांत उकाड्यामुळे नागरिकांना अस्वस्थतेचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे पावसाची किंवा थंडाव्याची प्रतीक्षा करणाऱ्यांना आणखी काही काळ उष्ण हवामान सहन करावं लागू शकतं.
हेही वाचा- ठाणेकरांनो, पाणी जपून वापरा! मुंब्रा, कळवा, दिव्यात 36 तास पाणीपुरवठा बंद
तर उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांत आज हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. यासोबतच उष्णता वाढण्याचीही शक्यता आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश भागांत हवामान कोरडं आणि उष्ण राहण्याची शक्यता आहे. तर काही भागांत हलक्या पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज आहे. पावसाची अनिश्चितता आणि वाढती उष्णता यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर या भागांमध्ये उष्णतेची तीव्रता जाणवत असल्याचं हवामान विश्लेषणात सांगण्यात आलं आहे. तर विदर्भातही आज उष्णता वाढण्याची शक्यता आहे. या भागांत कमाल तापमान 30 अंश सेल्सिअसच्या पुढे राहण्याची शक्यता असल्याने नागरिकांना उष्णतेचा चटका जाणवू शकतो. पुढील दोन ते तीन दिवसात कोणत्याही पावसाचा इशारा विदर्भात देण्यात आला नाही. राज्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.