Monday, March 09, 2026 02:08:07 AM

AI Drinking Water : AI मुळे जगावर जलसंकट? गुगलचे डेटा सेंटर्स दरवर्षी पितायत 6.1 अब्ज गॅलन शुद्ध पाणी; नोकऱ्यांनंतर आता पाणीही...

एआय डेटा सेंटर्समध्ये शक्तिशाली प्रोसेसर आणि GPU असतात, जे सामान्य लॅपटॉपपेक्षा लाखो पटीने उष्णता निर्माण करतात. हे तापमान कमी करण्यासाठी 'वॉटर कूलिंग' सिस्टीमचा वापर होतो.

ai drinking water  ai मुळे जगावर जलसंकट गुगलचे डेटा सेंटर्स दरवर्षी पितायत 61 अब्ज गॅलन शुद्ध पाणी नोकऱ्यांनंतर आता पाणीही

AI Drinking Water : आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) तंत्रज्ञान आपल्या कामाची पद्धत बदलत असले तरी, त्यामागे एक भयानक वास्तव दडले आहे. एआय केवळ नोकऱ्यांवर गदा आणत नसून, भविष्यात जगाला तहानेने व्याकुळ करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गुगलच्या 2024 इन्व्हॉयरमेंटल रिपोर्टनुसार, एआय डेटा सेंटर्स दरवर्षी अब्जावधी गॅलन शुद्ध पाणी फस्त करत आहेत. नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित 'AI Impact Summit' मध्ये या गंभीर धोक्यावर जागतिक स्तरावरील टेक नेत्यांनी चिंता व्यक्त केली आहे.

अब्जावधी गॅलन पाण्याची प्रचंड 'तहान'
गुगलच्या अहवालानुसार, कंपनीचे डेटा सेंटर्स दरवर्षी सुमारे 6.1 Billion (अब्ज) गॅलन शुद्ध पाण्याचा वापर करत आहेत. 2023 मधील ही आकडेवारी 2022 च्या तुलनेत 17% ने वाढली आहे. केवळ गुगलच नाही, तर मायक्रोसॉफ्ट आणि चॅटजीपीटी (OpenAI) सारख्या कंपन्यांचे सर्व्हरही तितकीच पाण्याची खपत करत आहेत. जेव्हा चॅटजीपीटीने 'Ghibli' फीचर लाँच केले होते, तेव्हा सर्व्हर इतका गरम झाला की सॅम ऑल्टमॅन यांना ते वापरू नका, अशी विनंती करावी लागली होती. इतक्या पाण्यातून लाखो एकर शेती ओलिताखाली येऊ शकते किंवा अनेक शहरांची तहान भागू शकते.

डेटा सेंटरमध्ये शुद्ध पाण्याचाच वापर का?
एआय डेटा सेंटर्समध्ये शक्तिशाली प्रोसेसर आणि GPU असतात, जे सामान्य लॅपटॉपपेक्षा लाखो पटीने उष्णता निर्माण करतात. हे तापमान कमी करण्यासाठी 'वॉटर कूलिंग' सिस्टीमचा वापर होतो. यामध्ये केवळ शुद्ध RO पाण्याचाच वापर केला जातो, कारण नैसर्गिक पाण्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियमसारखे मिनरल्स असतात, जे चिपवर थर जमा करून सिस्टम खराब करू शकतात. सर्वात चिंतेची बाब म्हणजे, या प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या पाण्याचा 80 टक्के भाग वाफेच्या रूपात हवेत उडून जातो, ज्यामुळे त्याचे रिसायकलिंग करणे अशक्य होते.

हेही वाचा - Google Play Store: तुमच्या मोबाईलमध्ये आहेत का हे अ‍ॅप? गुगलने 17.5 लाख अ‍ॅप्सवर घातली बंदी

2028 पर्यंत धोक्याची पातळी 11 पटीने वाढणार
क्लायमेट सायंटिस्ट मॉर्गन स्टॅनले यांच्या संशोधनानुसार, 2028 पर्यंत एआय डेटा सेंटर्समधील पाण्याची खपत 11 पटीने वाढण्याची शक्यता आहे. एका अंदाजानुसार, एका डेटा सेंटरमध्ये दररोज वापरले जाणारे पाणी किमान 50,000 लोकांची तहान भागवू शकते. एआय सध्या ट्रान्झिशन फेजमध्ये असून सर्च आणि जनरेटिव्ह एआयचा वापर जसजसा वाढेल, तसतशी ही पाण्याची 'भूक'ही वाढत जाणार आहे. हे भविष्यकालीन जगासाठी एक मोठे धोक्याचे संकेत (Alarming sign) आहे.

पर्यावरण आणि टेक कंपन्यांसमोर मोठे आव्हान
तंत्रज्ञानाची प्रगती होत असताना नैसर्गिक संसाधनांचा होत असलेला हा ऱ्हास टेक कंपन्या आणि सरकारांसमोर मोठे आव्हान उभे करत आहे. भविष्यात केवळ वीजच नाही, तर शुद्ध पाण्याचे जतन करणे ही सर्वात मोठी समस्या ठरणार आहे. जर एआयची तहान भागवण्यासाठी मानवाच्या वाट्याचे पाणी वापरले गेले, तर भविष्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होऊ शकते. त्यामुळे केवळ एआयच्या कार्यक्षमतेवरच नाही, तर त्याच्या पर्यावरणीय प्रभावावरही नियंत्रण मिळवणे आता काळाची गरज बनली आहे.

हेही वाचा - Microsoft Investment: भारतात AI क्रांती, गुगल पाठोपाठ मायक्रोसॉफ्टची 50 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक; सामान्यांचे जीवन होणार सुसह्य


सम्बन्धित सामग्री