मुंबई: देशातील हवाई प्रवाशांसाठी एक मोठी आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. पुढील काही दिवसांत IndiGo, Air India किंवा Air India Express ने प्रवास करण्याची योजना असल्यास तुम्हाला फ्लाइटला उशिरा होणे किंवा फ्लाईट रद्द होण्याचा सामना करावा लागू शकतो. कारण Airbus A320 फॅमिलीच्या विमानांमध्ये गंभीर तांत्रिक बिघाड आढळला असून देशातील 200 ते 250 पेक्षा जास्त विमानांना तातडीने सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर अपडेटची आवश्यकता निर्माण झाली आहे. याचा थेट परिणाम विमानांच्या नियमित उड्डाणावर आणि फ्लाइट शेड्यूलवर होणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विमान निर्माता कंपनी Airbus ने सर्व एअरलाइन्सना इशारा दिला आहे की अलीकडेच A320 विमानात अचानक uncommanded pitch down घडल्याची घटना नोंदली गेली. तपासात ही समस्या विमानातील Elevator Aileron Computer (ELAC) मध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडाशी संबंधित असल्याचे स्पष्ट झाले. एअरबसने सांगितले की हा दोष त्वरित दूर केला नाही तर विमानाच्या फ्लाइट कंट्रोल सिस्टिमवर गंभीर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे सुरक्षा धोक्यात येऊ शकते. युरोपियन युनियनच्या EASA (European Union Aviation Safety Agency) ने स्पष्ट आदेश दिले आहेत की प्रभावित विमानांमध्ये तत्काळ सर्व्हिसेबल ELAC बसवणे अनिवार्य आहे आणि हे अपडेट पुढील उड्डाणापूर्वीच केले गेले पाहिजे.
हेही वाचा: Mumbai Local: मुंबई लोकल वेळापत्रक विस्कळीत होणार? मध्य रेल्वेचा 18 तासांचा ब्लॉक
भारतामध्ये सध्या A320 या समूहातील सुमारे 560 विमाने उड्डाण करतात, त्यापैकी जवळपास 50 टक्के विमान संख्या या तांत्रिक अडचणीच्या कक्षेत येतात. म्हणजेच मोठ्या संख्येने विमानांना तात्पुरते ग्राउंड केले जाऊ शकते. IndiGo ने माहिती दिली की ते Airbus सोबत सातत्याने समन्वय साधत आहेत आणि प्रवाशांना कमीत कमी गैरसोय व्हावी यासाठी प्रयत्न करतील. तर Air India Express ने सांगितले की त्यांनी तात्काळ आवश्यक काळजी घेणे सुरू केले आहे आणि त्यामुळे काही फ्लाइट्स उशिरा होऊ शकतात किंवा रद्द केल्या जाऊ शकतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार Air India Express च्या 31 A320 विमानांवर या अपडेटचा थेट परिणाम होणार आहे. Air India नेही मान्य केले आहे की या अपडेटमुळे टर्नअराउंड टाइम वाढेल आणि शेड्यूलवर त्याचा परिणाम दिसेल.
प्रवासावर काय परिणाम होऊ शकतो?
A320 विमानातील या तांत्रिक समस्येमुळे अनेक रूट्सवरील फ्लाइट्स उशिरा धावू शकतात. काही उड्डाणे रद्द केली जाऊ शकतात किंवा त्यांच्या वेळेत अचानक बदल होऊ शकतो. यामुळे प्रवाशांना विमानतळावर अधिक वेळ थांबावे लागू शकते. एअरलाइन्सनी मात्र स्पष्ट केले आहे की ते प्रवाशांना कमीत कमी अडचण व्हावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील, परंतु सुरक्षेला प्राधान्य दिले जाणे अत्यावश्यक आहे.
हेही वाचा: Smriti Mandhana: लग्नाची अनिश्चितता… पण स्मृती मानधनाच्या मैदानात परतण्याची तारीख ठरली