Ajit Pawar Plane Crash Latest Update : बारामती विमानतळाजवळ झालेल्या भीषण अपघातानंतर विमानातील सुरक्षा यंत्रणेबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भारताने विकसित केलेली 'गगन' (GAGAN - GPS Aided Geo Augmented Navigation) ही एक उपग्रह-आधारित मार्गदर्शन प्रणाली आहे. ही यंत्रणा विशेषतः बारामतीसारख्या छोट्या विमानतळांवर, जिथे महागडी ILS (Instrument Landing System) उपलब्ध नसते, तिथे वैमानिकांना कमी दृश्यमानतेतही अचूक लँडिंगसाठी मदत करते. मात्र, अजित पवार ज्या विमानातून प्रवास करत होते, त्या 16 वर्षे जुन्या 'लिअरजेट'मध्ये ही प्रगत यंत्रणा बसवलेली नसल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
केवळ 28 दिवसांच्या फरकाने मुदत हुकली!
या विमानाची भारतात नोंदणी 2 जून 2021 रोजी झाली होती. योगायोगाने, या नोंदणीनंतर अवघ्या 28 दिवसांनी, म्हणजेच 1 जुलै 2021 पासून नागरी विमान वाहतूक क्षेत्रात एक नवीन नियम लागू झाला. या नियमानुसार, त्यानंतर नोंदणी होणाऱ्या सर्व नवीन विमानांमध्ये 'गगन' यंत्रणा असणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र, हे विमान या डेडलाईनच्या काही दिवस आधीच नोंदणीकृत झाल्यामुळे, त्याला ही यंत्रणा बसवण्याचे कायदेशीर बंधन नव्हते. परिणामी, खराब हवामानात लँडिंगसाठी आवश्यक असणाऱ्या सॅटेलाईट मार्गदर्शनापासून हे विमान वंचित राहिले.
दृश्यमानता कमी असताना 'स्टेप डाऊन' लँडिंगचा धोका
बारामती विमानतळ हे 'अनकंट्रोल्ड एअरफिल्ड' श्रेणीत येते, जिथे पूर्णवेळ एअर ट्रॅफिक कंट्रोलर्स नसतात. अशा ठिकाणी प्रगत आयएलएस किंवा 'गगन' प्रणाली नसल्यास वैमानिकांना 'स्टेप डाऊन अप्रोच' (Step Down Approach) या पारंपरिक पद्धतीवर अवलंबून राहावे लागते. यामध्ये वैमानिकाला टप्प्याटप्प्याने विमान खाली आणून स्वतःच्या डोळ्यांनी धावपट्टी पाहावी लागते. अपघाताच्या वेळी धुके असल्याने दृश्यमानता कमी होती, अशा परिस्थितीत प्रगत यंत्रणेच्या अभावामुळे लँडिंग करणे अत्यंत आव्हानात्मक आणि धोकादायक ठरले असावे, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.
हेही वाचा - Learjet-45 Private Plane : अजित पवारांनी अखेरचा प्रवास केलेलं 'लिअरजेट-45' नेमकं कसं होतं? पाहा तांत्रिक वैशिष्ट्ये
अपघातग्रस्त विमानाची पार्श्वभूमी
हे विमान 'व्हीएसआर व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड' या कंपनीच्या मालकीचे होते. 16 वर्षे जुन्या असलेल्या या विमानाने सकाळी 8:10 वाजता मुंबईहून उड्डाण केले होते. कमी दृश्यमानता असताना दुसऱ्यांदा लँडिंगचा प्रयत्न करत असतानाच हे विमान कोसळले. तांत्रिक तज्ज्ञांच्या मते, जर या विमानात 'गगन' ही प्रगत एव्हिओनिक्स प्रणाली असती, तर वैमानिकाला धावपट्टीचा अचूक अंदाज आला असता आणि कदाचित हा अनर्थ टळला असता.
तपासाच्या केंद्रस्थानी नेव्हिगेशन यंत्रणा
सध्या डीजीसीए (DGCA) आणि अन्य तपास यंत्रणा विमानातील तांत्रिक उपकरणांची तपासणी करत आहेत. जुन्या विमानांना नवीन सुरक्षा प्रणाली लागू करण्याबाबतच्या नियमावलीत असलेल्या त्रुटी या अपघाताला कारणीभूत ठरल्या का, याचाही शोध घेतला जात आहे. या दुर्घटनेत अजित पवारांसह एकूण 6 जणांचा मृत्यू झाला असून, एका प्रगत नेव्हिगेशन प्रणालीच्या अभावामुळे महाराष्ट्राने आपला एक महत्त्वाचा नेता गमावला, अशी चर्चा आता जोर धरू लागली आहे.
हेही वाचा - Sharad Pawar First Reaction : 'हा निव्वळ अपघात, घातपात नाही'; अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया