छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरहून गोव्याला जाणाऱ्या थेट विमानसेवेला अवघ्या 24 दिवसांत ब्रेक लागला आहे. 1 ऑक्टोबरपासून सुरू झालेली इंडिगोची विमानसेवा 25 ऑक्टोबरपासून लागू होणाऱ्या हिवाळी वेळापत्रकात बंद झाली आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरहून थेट विमानाने गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे. गोवा हे पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठिकाण असल्याने या विमानसेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. मात्र, नव्या हिवाळी वेळापत्रकात या सेवेचा समावेश करण्यात आलेला नाही. विमान कंपन्यांकडून विमानांची उपलब्धता आणि इतर अडचणींची कारणे दिली जात असताना, ही सेवा पुन्हा कधी सुरू होणार, याबाबत स्पष्टता नाही. त्यामुळे गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांना आता पर्यायी प्रवासमार्गांचा वापर करावा लागणार आहे.