दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असल्याने नागरिकांना उन्हाच्या चटक्यासह उकाड्याचा सामना करावा लागत आहे. मात्र बंगालच्या उपसागरात घोंगावणाऱ्या चक्रीवादळामुळे वातावरणात बदल जाणवत आहे. या चक्रीवादळामुळे देशातील 20 राज्यांना पावसाचा अलर्ट देण्यात आला असला तरी महाराष्ट्रात मात्र उकाडा कायम असणार आहे.
महाराष्ट्रातील बहुतांश भागांत उष्ण आणि कोरडे हवामान अनुभवायला मिळत आहे. काही ठिकाणी हलक्या सरींचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आज कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यांत उष्ण व दमट हवामानाचा अंदाज असल्याने येलो अलर्ट देण्यात आला आहे. तसेच काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ हवामानासह उकाडा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
उत्तर महाराष्ट्रात आज कमाल तापमान 30 अंश सेल्सिअसच्या पुढे असून पुढील काही दिवस धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक येथे प्रामुख्याने कोरडे व उष्ण हवामान राहण्याची शक्यता आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, अहिल्यानगर, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर येथे हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे. या भागात कमाल तापमान 32 अंश सेल्सिअसच्या पुढे राहण्याचा अंदाज आहे.
पुढील दोन दिवसात मराठवाडा आणि विदर्भात कोरडे वातावरण राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड आणि लातूर येथे कमाल तापमान 35 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज असल्याने नागरिकांना उन्हाचा चटका जाणवू शकतो.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.