रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! मध्य रेल्वेच्या ‘या’ 18 गाड्यांचे तिकीट दर होणार कमी

येत्या 1 जानेवारी 2027 पासून मध्य रेल्वेच्या मार्गावरून धावणाऱ्या 18 लांब पल्ल्याच्या मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांचे तिकीट दर लक्षणीयरीत्या कमी होणार आहेत.
रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! मध्य रेल्वेच्या ‘या’ 18 गाड्यांचे तिकीट दर होणार कमी
Central Railway train ticket price drop

मध्य रेल्वेने प्रवाशांच्या खिशावरील आर्थिक भार कमी करण्यासाठी एक मोठा आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. येत्या 1 जानेवारी 2027 पासून मध्य रेल्वेच्या मार्गावरून धावणाऱ्या 18 लांब पल्ल्याच्या मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांचे तिकीट दर लक्षणीयरीत्या कमी होणार आहेत. रेल्वे प्रशासनाने या 18 गाड्यांचा ‘सुपरफास्ट’ हा विशेष दर्जा काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे आता प्रवाशांना प्रवासादरम्यान द्यावे लागणारे अतिरिक्त सुपरफास्ट शुल्क भरावे लागणार नाही, ज्यामुळे सामान्य नागरिकांना स्वस्तात प्रवास करता येणार आहे.

‘सुपरफास्ट’ दर्जा रद्द झाल्यामुळे तिकीट दरात कपात

रेल्वेच्या नियमांनुसार सुपरफास्ट गाड्यांच्या तिकिटांवर प्रवाशांकडून विशेष अधिभार (Superfast Surcharge) आकारला जातो. मात्र, 1 जानेवारी 2027 पासून मध्य रेल्वेने या निवडक 18 गाड्यांना सामान्य ‘एक्स्प्रेस’ वर्गवारीत चालवण्याचे ठरवले आहे. त्यामुळे तिकिटांमधील अतिरिक्त अधिभार पूर्णपणे वगळला जाईल आणि प्रवाशांना थेट स्वस्त तिकिटांचा लाभ मिळेल. या बदलामुळे मुंबई आणि पुणे शहरांना महाराष्ट्रातील विविध भागांशी तसेच इतर राज्यांतील प्रमुख शहरांशी जोडणाऱ्या 8 महत्त्वाच्या मार्गावरील तब्बल 18 रेल्वे फेऱ्यांवर थेट सकारात्मक परिणाम होणार आहे.

या प्रमुख गाड्यांच्या तिकिटांचे दर होणार कमी

प्रवाशांच्या सोयीसाठी दर कमी होणाऱ्या गाड्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते हिंगोली जनशताब्दी एक्स्प्रेस, सीएसएमटी ते पुणे प्रगती एक्स्प्रेस, सीएसएमटी ते बनारस महानगरी एक्स्प्रेस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) ते अयोध्या कॅन्ट तुळशी एक्स्प्रेस यांसारख्या लोकप्रिय गाड्यांचा समावेश आहे. याशिवाय एलटीटी-तिरुवनंतपुरम नॉर्थ एक्स्प्रेस, एलटीटी-करमळी एक्स्प्रेस, सीएसएमटी-चेन्नई एक्स्प्रेस आणि पुणे-काझीपेट एक्स्प्रेस या गाड्यांचाही यात समावेश असून, या सर्व मार्गांवरील प्रवाशांना तिकीट दरात मोठा दिलासा मिळणार आहे.

हेही वाचा –  दिवाळीपूर्वी सोने-चांदीच्या दरात आतापर्यंतची मोठी घसरण; तोळ्यामागे 1690 रुपये, तर चांदी 5000 रुपयांनी स्वस्त!

नवीन रेल्वे क्रमांक आणि आरक्षणासाठी प्रवाशांना सूचना

गाड्यांचा दर्जा बदलल्यामुळे 1 जानेवारी 2027 पासून या 18 गाड्यांचे जुने क्रमांकही बदलले जाणार आहेत. त्यामुळे प्रवाशांनी नवीन वर्षात रेल्वेचे तिकीट बुक करताना किंवा प्रवास आखताना सुधारित ट्रेन क्रमांक, नवीन तिकीट दर आणि आरक्षणाची वेळ नीट तपासून घ्यावी, असे आवाहन मध्य रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. रेल्वेकडून नवीन क्रमांकांची अधिकृत यादी प्रसिद्ध झाल्यानंतर त्यानुसारच प्रवाशांनी आपल्या प्रवासाचे नियोजन करावे, असा सल्ला देण्यात आला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version