छत्रपती संभाजीनगरमध्ये FDA ची मोठी कारवाई! 8 हॉटेल्स आणि इंडस्ट्रियल कॅन्टीनचे परवाने निलंबित

छत्रपती संभाजीनगरमध्ये FDA ने तपासणीत गंभीर त्रुटी आढळल्यानंतर आठ हॉटेल्स आणि इंडस्ट्रियल कॅन्टीनचे परवाने निलंबित केले. अस्वच्छता, कीटकांचा प्रादुर्भाव आणि अन्न साठवणुकीतील निष्काळजीपणा उघडकीस आला.
छत्रपती संभाजीनगरमध्ये FDA ची मोठी कारवाई! 8 हॉटेल्स आणि इंडस्ट्रियल कॅन्टीनचे परवाने निलंबित

छत्रपती संभाजीनगर शहर आणि औद्योगिक परिसरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स तसेच इंडस्ट्रियल कॅन्टीनमध्ये अन्न सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे समोर आले आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित या गंभीर बाबींची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) आठ आस्थापनांवर कठोर कारवाई केली आहे. अचानक केलेल्या तपासणीत अस्वच्छता, उंदीर आणि कीटकांचा प्रादुर्भाव, अन्न साठवणुकीतील निष्काळजीपणा तसेच कर्मचाऱ्यांच्या आरोग्याबाबत नियमांचे उल्लंघन आढळले. त्यामुळे संबंधित आठ आस्थापनांचे परवाने अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, २००६ मधील कलम ३२(३) नुसार तात्काळ निलंबित करण्यात आले आहेत.

तपासणीत अनेक गंभीर त्रुटी उघड

FDA च्या तपासणीत बीड बायपास रोडवरील हॉटेल कार्निव्हल बार अँड रेस्टॉरंटमध्ये किचनमधील उपकरणांची दुरवस्था, कच्चे आणि शिजवलेले अन्न एकत्र साठवणे तसेच कीटकांचा प्रादुर्भाव आढळला. बीड बायपास परिसरातील हॉटेल निशांत पार्कमध्ये किचनमध्ये उंदीर आणि कीटक आढळले. गंजलेली उपकरणे वापरली जात असल्याचेही निदर्शनास आले. यापूर्वी सुधारणा करण्याची नोटीस देऊनही नियमांचे पालन झाले नसल्याचे तपासणीत स्पष्ट झाले.

एमआयडीसी वाळूज येथील मिताली राजयोगमध्ये उपकरणांचे निर्जंतुकीकरण केले जात नव्हते. कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी नसणे, तसेच एप्रन आणि हातमोजे न वापरणे अशा त्रुटी आढळल्या. याच परिसरातील एफएस सर्व्हिसेस प्रा. लि. अर्थात एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजी कॅन्टीनमध्ये अस्वच्छ आणि गर्दीचे किचन, भिंतींचे निघालेले पापुद्रे, कोळ्यांची जाळी आणि अन्न साठवणुकीसाठी तापमान नियंत्रणाचा अभाव दिसून आला.

कॅन्टीन आणि रेस्टॉरंटमध्येही नियमांचे उल्लंघन

शेंद्रा एमआयडीसीतील राधाकृष्ण गृह उद्योगात उत्पादनासाठी आवश्यक वेळ आणि तापमानाचे पालन होत नसल्याचे आढळले. कीड नियंत्रणाच्या उपाययोजनांचाही अभाव होता. बालापूर येथील टेबल ९ गार्डन रेस्टॉरंटच्या स्टोअरमध्ये अन्नधान्य थेट जमिनीवर ठेवले होते. कच्चे आणि शिजवलेले अन्न तसेच अन्नाशी संबंधित नसलेल्या वस्तू एकत्र साठवण्यात आल्या होत्या.

वाळूजमधील विद्या एन्टरप्राईजेस अर्थात एफडीसी कंपनीच्या कॅन्टीनमध्ये अन्नाच्या संपर्कात येणारी उपकरणे गंजलेली होती. वापरल्या जाणाऱ्या पाण्याची आणि तेलाची चाचणी करण्यात आली नव्हती. कच्चा मालही अस्वच्छ असल्याचे आढळले. ग्रीन प्युअर व्हेजमध्ये कीड नियंत्रणाचा अभाव, दरवाजे-खिडक्यांना जाळ्या नसणे आणि अन्न साठवणुकीचे तापमान नियंत्रित नसणे अशा त्रुटी आढळल्या. कच्चे-शिजवलेले तसेच शाकाहारी-मांसाहारी अन्न एकत्र ठेवण्यात आले होते. कर्मचाऱ्यांचे FoSTaC प्रशिक्षण आणि वैद्यकीय अहवालही उपलब्ध नव्हते.

नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने कारवाई

अन्नपदार्थांची स्वच्छता, योग्य साठवणूक आणि अन्न तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आरोग्य या बाबी अन्न सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. मात्र, तपासणीत अनेक ठिकाणी या नियमांकडे दुर्लक्ष झाल्याचे समोर आले. त्यामुळे FDA ने आठ आस्थापनांचे परवाने निलंबित केले आहेत. या कारवाईमुळे शहरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि औद्योगिक कॅन्टीनमधील अन्न सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version