Saturday, March 07, 2026 01:53:47 AM

Bank Locker Scam: बँक लॉकरमधून तब्बल 60 लाखांचे दागिने गायब! महिलेच्या दाव्याने खळबळ; पोलिसांकडून कसून तपास सुरू

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार, लॉकरमधील सामानाची सुरक्षा ही बँकेची जबाबदारी असते. जाणून घ्या, कोणत्या परिस्थितीत भरपाई मिळू शकते आणि कोणत्या परिस्थितीत नाही..

bank locker scam बँक लॉकरमधून तब्बल 60 लाखांचे दागिने गायब महिलेच्या दाव्याने खळबळ पोलिसांकडून कसून तपास सुरू

Bank Locker Scam : बँक लॉकर हे मौल्यवान वस्तूंच्या सुरक्षेसाठी सर्वात सुरक्षित ठिकाण मानले जाते, मात्र राजधानी दिल्लीत एका महिलेने केलेल्या दाव्याने संपूर्ण बँकिंग यंत्रणा हादरली आहे. कीर्ती नगर येथील एका नामांकित बँकेच्या लॉकरमधून तब्बल 60 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने गायब झाल्याचा आरोप या महिलेने केला आहे. विशेष म्हणजे, बँकेच्या अधिकृत प्रक्रियेनुसार (SOP) लॉकर उघडल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

लॉकरशी छेडछाड नाही, मग दागिने गेले कुठे?
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने जेव्हा बँक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आपले लॉकर उघडले, तेव्हा त्यात ठेवलेले सोन्याचे दागिने गायब असल्याचे आढळले. या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या (Crime Branch) पथकाने घटनास्थळी धाव घेत तपासणी केली. मात्र, प्राथमिक तपासात लॉकरशी किंवा त्याच्या कुलूपाशी कोणतीही छेडछाड झाल्याचे किंवा जबरदस्तीने लॉकर उघडल्याच्या कोणत्याही खुणा आढळल्या नाहीत. बँकेच्या रेकॉर्डनुसार, तक्रारदार महिलेने यापूर्वीही अनेकदा या लॉकरचा वापर केला होता. 21 फेब्रुवारी 2026 रोजी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि बँकेचे तांत्रिक रेकॉर्ड ताब्यात घेतले आहे.

बँकेतील इतर ग्राहकांमध्ये घबराट
लॉकरमधून चोरी झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच इतर अनेक लॉकरधारकांनी आपल्या वस्तू सुरक्षित आहेत की नाही, हे तपासण्यासाठी बँकेत गर्दी केली. मात्र, इतर कोणत्याही ग्राहकाने चोरीची तक्रार केलेली नाही. पोलिसांनी तपासणी केली असता, संबंधित महिलेच्या लॉकरव्यतिरिक्त इतर कोणतेही लॉकर तुटलेले किंवा संशयास्पद स्थितीत आढळले नाही. सोशल मीडियावर या प्रकरणावरून उलटसुलट चर्चा सुरू असून, हा चोरीचा प्रकार आहे की कौटुंबिक वादातून घडलेली घटना, याबाबत पोलीस चौकशी करत आहेत. सध्या याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, चौकशीअंती सत्य समोर येईल.

हेही वाचा - GST Fraud: धक्कादायक! महिन्याला 6 हजार रुपये कमावणाऱ्या शिक्षकाला 2 कोटींची GST नोटीस

आरबीआयचे (RBI) नुकसानभरपाईचे नियम काय?
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार, लॉकरमधील सामानाची सुरक्षा ही बँकेची जबाबदारी असते. जर बँकेच्या निष्काळजीपणामुळे चोरी, दरोडा किंवा आगीसारखी घटना घडली, तर बँक नुकसानभरपाईसाठी जबाबदार असते. अशा परिस्थितीत, बँक ग्राहकाला लॉकरच्या वार्षिक भाड्याच्या 100 पट रक्कम भरपाई म्हणून देऊ शकते. मात्र, भूकंप किंवा पुरासारख्या नैसर्गिक आपत्तींमध्ये किंवा ग्राहकाच्या स्वतःच्या चुकीमुळे नुकसान झाले असल्यास, बँक भरपाई देण्यास बांधील नसते. या प्रकरणात महिलेचा दावा सिद्ध झाल्यास बँकेला मोठी रक्कम मोजावी लागू शकते.

बँक लॉकर वापरताना घ्यावयाची काळजी
अशा घटना टाळण्यासाठी बँकिंग तज्ज्ञ काही महत्त्वाच्या सूचना देतात. लॉकर उघडताना आणि बंद करताना नेहमी बँक कर्मचाऱ्यांसमोर खात्री करून घ्यावी. तसेच, लॉकरमध्ये ठेवलेल्या दागिन्यांची आणि वस्तूंची अद्ययावत यादी (Inventory) स्वतःकडे ठेवावी. दिल्लीतील या घटनेनंतर आता बँकांमधील सुरक्षा यंत्रणेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. जोपर्यंत पोलिसांचा तपास पूर्ण होत नाही, तोपर्यंत ही नेमकी 60 लाखांची चोरी आहे की तांत्रिक चूक, हे स्पष्ट होणार नाही.

हेही वाचा - Asha Sharma Microsoft: कँडी क्रश ते कॉल ऑफ ड्यूटी...; मायक्रोसॉफ्टच्या जागतिक गेमिंग साम्राज्याची धुरा भारतीय 'लेडी बॉस'कडे, कोण आहे ती?


सम्बन्धित सामग्री