Tuesday, November 18, 2025 09:26:47 PM

Maharashtra Local Body Election : ठाकरेंच्या मोर्चानंतर आयोगाला जाग, दुबार मतदारांच्या नावापुढे 'डबल स्टार' देणार

निवडणूक आयोगाने आवाहन केले आहे की, ज्यांच्या नावापुढे डबल स्टार असेल त्यांनी त्वरित निवडणूक आयोगाशी संपर्क साधावा.

maharashtra local body election  ठाकरेंच्या मोर्चानंतर आयोगाला जाग दुबार मतदारांच्या नावापुढे डबल स्टार देणार

मुंबई : महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगूल वाजले आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन मतदानाची आणि निकालाच्या तारखांची घोषणा केली आहे. या घोषणेपूर्वी राज्यात विरोधी पक्षांनी, विशेषतः ठाकरे गटाने, दुबार मतदारांच्या मुद्द्यावरून मोर्चा आयोजित केला होता आणि मतदार याद्यांमधील घोळ निस्तारून दुबार नावे हटवण्याची मागणी केली होती. या आरोपांची दखल घेत निवडणूक आयोगाने आता मतदार यादीबाबत एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

दुबार मतदारांवर आयोगाचा 'डबल स्टार' उतारा
विरोधी पक्षांच्या आरोपांनंतर निवडणूक आयोगाने दुबार मतदानासंदर्भात महत्त्वाचा नियम बनवला आहे. आयोगाने स्पष्ट केले आहे की, ज्या मतदाराचे नाव मतदार यादीमध्ये दोन वेळा आले आहे, त्याच्या नावापुढे 'डबल स्टार' लावला जाणार आहे. अशा दुबार मतदारांची नोंद वेगळी ठेवली जाणार आहे.
मतदानाची प्रक्रिया: ज्या मतदारांच्या नावापुढे डबल स्टार असेल, त्यांच्याकडून 'डिक्लेरेशन' (Declaration) घेतले जाईल आणि त्यांना एकाच मतदान केंद्रावर मतदान करता येईल. निवडणूक आयोगाने दुबार मतदारांसंदर्भात पूर्ण दक्षता घेतली असल्याचे स्पष्ट केले आहे.
निवडणूक आयोगाने आवाहन केले आहे की, ज्यांच्या नावापुढे डबल स्टार असेल त्यांनी त्वरित निवडणूक आयोगाशी संपर्क साधावा. ज्यांची नावे एकापेक्षा अधिक मतदारसंघांमध्ये असतील, त्यांची नावे यादीतून हटवली जातील.

हेही वाचा - EC On Maharashtra Election 2025 : महापालिकेची निवडणूक पुन्हा लांबणीवर!; 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर
निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे, ज्यासाठी आजपासून (पत्रकार परिषदेच्या दिवसापासून) आचारसंहिता लागू झाली आहे. 7 नोव्हेंबर रोजी मतदार याद्या जाहीर होतील.
10 डिसेंबर ते 17 नोव्हेंबर या दरम्यान उमेदवारांना अर्ज दाखल करता येतील. अर्जांची छाननी 18 नोव्हेंबरला होईल, तर 21 नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहे. 2 डिसेंबर रोजी मतदान होईल. निवडणुकांचे निकाल 3 डिसेंबर रोजी लागणार आहेत.
या निवडणुकांसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत नोंदणी झालेल्या मतदारांना मतदान करता येणार आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाने अजून जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुकांची घोषणा केलेली नाही.

हेही वाचा - Maharashtra Cabinet Decision: राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नागरिकांसाठी 21 नवे निर्णय! गरीब रुग्णांना मिळणार 10 लाखांपर्यंत मदत


सम्बन्धित सामग्री