उत्तर प्रदेशातील पूर्वांचल एक्स्प्रेसवेवर भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. शहीद जवानाचे पार्थिव लडाखतून विमानाने आणल्यानंतर पुढे त्याच्या मूळ गावी पोहोचवण्यासाठी रुग्णवाहिकेने नेले जात होते. मात्र, वाटेतच हा काळजाचा ठोका चुकवणारा अपघात घडला.
उत्तर प्रदेशातील पूर्वांचल एक्स्प्रेसवेवर लडाखमध्ये शहीद झालेल्या एका जवानाचे पार्थिव घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेने ट्रकला मागून जोरदार धडक दिली. हा अपघात इतका अत्यंत हृदयद्रावक आणि भीषण होता की, रुग्णवाहिकेचा अक्षरशः चक्काचूर झाला. या अपघातात रुग्णवाहिकेत असलेल्या चार जणांचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि महामार्ग पोलिसांची टीम तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. तसेच पोलिसांनी तात्काळ बचावकार्य सुरू करून मृतदेह बाहेर काढले. मृतदेह पोस्टमार्टमसाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले आहेत. सध्या पोलीस या अपघाताचा अधिक तपास करत आहेत.
उभा असलेला ट्रक कोणाचा होता आणि अपघात नेमका कसा घडला? याचा शोध घेतला जात आहे. या भीषण अपघाताची दखल घेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या नातेवाईकांप्रती तीव्र दुख व्यक्त केले आहे. दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात अत्यंत शोकाकूल वातावरण पसरले आहे.