मुंबई : मराठी रंगभूमीवर मालवणी संस्कृतीचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ नाटककार आणि दिग्दर्शक गंगाराम गवाणकर यांचे निधन झाले आहे. दहिसर येथील खासगी रुग्णालयात सोमवारी रात्री 86व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मावळली . काही महिन्यांपासून त्यांची प्रकृती अस्वस्थ होती. त्यांच्या जाण्याने मराठी रंगभूमीने एक समर्थ, प्रयोगशील आणि ओजस्वी व्यक्तिमत्त्व गमावले आहे.
गवाणकर यांनी कोकणी जीवनशैली, मालवणी भाषेचा सुगंध आणि लोकजीवनातील वास्तव मराठी रंगभूमीवर प्रभावीपणे सादर केले. त्यांच्या ‘वेडी माणसं’ या पहिल्या नाटकानेच प्रेक्षकांचे लक्ष वेधले आणि नंतर ‘दोघी’, ‘वर भेटू नका’, ‘वर परीक्षा’ यांसारख्या नाटकांनीही उत्कृष्ट यश मिळवले. त्यांची भाषा विनोदी, व्यंगात्मक आणि जीवनाशी घट्ट जोडलेली असल्याने प्रेक्षकांशी सहज संवाद निर्माण होत राहिला.
गवाणकर यांची कलात्मक ओळख ठरलेले ‘वस्त्रहरण’ हे नाटक मराठी रंगभूमीवर ऐतिहासिक ठरले. या नाटकाने मालवणी बोलीभाषेला स्वतंत्र मंच मिळवून दिला. तब्बल 5,000 पेक्षा जास्त प्रयोग होत राहिल्याने हे नाटक लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचले. दिल्लीतील नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्येही त्याचे सादरीकरण झाले, जो मराठी नाटकासाठी मोठा सन्मान मानला जातो. याच नाटकातून प्रेक्षकप्रिय कलाकार मच्छिंद्र कांबळी यांचा नटसम्राट म्हणून उदय झाला.
हेही वाचा: Satish Shah's Last Message: सोशल मीडियावरील ट्रोलिंगनंतर सचिन पिळगावकरांचा मोठा खुलासा; मेसेज शेअर करत ट्रोलर्सला दिलं उत्तर
तरुणपणी जे. जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये शिक्षण घेत असताना गवाणकर यांनी ‘वस्त्रहरण’ची मूळ संकल्पना केवळ 20 पानांत लिहिली होती. नाटकाची हस्तलिखित प्रत चार वेळा हरवूनही त्यांनी हरकत न घेता संपूर्ण नाटक पुन्हा-पुन्हा लिहिले. कलेवर असलेली त्यांची निष्ठा आणि मालवणी संस्कृतीवरील प्रेम याचे ते विलक्षण उदाहरण होते.
‘वस्त्रहरण’ बरोबरच ‘व्हाट्राट मेले’, ‘वन रूम किचन’ यांसारख्या नाटकांनी हजारो प्रयोगांचा टप्पा पार करत प्रेक्षकांचा आदर मिळवला. महाराष्ट्रातील नाट्यपरंपरा का जिवंत आहे हे सांगताना ते नेहमी म्हणत, “कोकणातील गावात विहीर नसेल, तरी नाटक मात्र ठेवलेलं असतं.” ही त्यांची रंगभूमीवरील श्रद्धा होती.
गवाणकर यांच्या निधनानंतर त्यांच्या मागे तीन मुलगे, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. मराठी रंगभूमीची सेवा हेच जीवनधर्म मानणाऱ्या या थोर नाटककाराची आठवण त्यांच्या लेखनातून सदैव जिवंत राहील.
हेही वाचा: Cyclone Montha Update : आंध्र प्रदेशात भूस्खलनाची शक्यता; तामिळनाडू, ओडिशामध्येही मुसळधार पावसाचा इशारा