Friday, February 13, 2026 12:08:32 AM

Gold-Silver Price Crash: चांदीचे दर एका दिवसात तब्बल 1 लाख रुपयांनी घसरले, सोन्यातही झपाट्याने घसरण; गुंतवणूकदारांना मार्केटमध्ये मोठा फटका

सराफा बाजारात मोठी उलथापालथ पाहायला मिळाली आहे. चांदीच्या दरात एका दिवसात एक लाखांहून अधिक घसरण झाली असून, सोन्याचे दरही मोठ्या प्रमाणात खाली आले आहेत. यामुळे गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आहे.

gold-silver price crash चांदीचे दर एका दिवसात तब्बल 1 लाख रुपयांनी घसरले सोन्यातही झपाट्याने घसरण गुंतवणूकदारांना मार्केटमध्ये मोठा फटका

Gold-Silver Price Crash: सोन्या-चांदीच्या किमतींनी गेल्या काही दिवसांत उच्चांकी पातळी गाठल्यानंतर आता सराफा बाजारात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. विक्रमी वाढीनंतर अचानक झालेल्या जोरदार घसरणीमुळे गुंतवणूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे. विशेषतः चांदीच्या दरात झालेली मोठी घसरण ही बाजारासाठी धक्कादायक ठरली आहे.

गेल्या काही आठवड्यांपासून सोन्या-चांदीचे दर सातत्याने वाढत होते. सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होत असल्याने या मौल्यवान धातूंनी नवनवे विक्रम प्रस्थापित केले. मात्र, आता परिस्थिती अचानक बदललेली दिसत आहे. एका दिवसातच चांदीच्या दरात तब्बल एक लाख रुपयांहून अधिक घसरण नोंदवण्यात आली आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) गुरुवारी चांदीच्या दराने ऐतिहासिक उच्चांक गाठला होता. चांदीचा भाव प्रति किलो चार लाखांच्या जवळ पोहोचला होता. मात्र, वायदा बाजारात एक्सपायरीनंतर शुक्रवारी दरात मोठी घसरण झाली. पाच मार्च एक्सपायरी असलेल्या चांदीच्या करारामध्ये वेगाने घसरण होत चांदीचा दर थेट दोन लाख ९० हजारांच्या आसपास येऊन पोहोचला. एका झटक्यात प्रति किलो सुमारे एक लाख रुपयांची घट झाल्याने बाजारात एकच खळबळ उडाली.

विशेष म्हणजे ही घसरण केवळ वायदा बाजारापुरती मर्यादित राहिलेली नाही, तर स्थानिक सराफा बाजारातही त्याचे पडसाद उमटले आहेत. चांदीत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना यामुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. मात्र, दुसरीकडे पाहता, चांदी खरेदीसाठी वाट पाहणाऱ्या ग्राहकांसाठी ही घसरण काहीशी दिलासादायक ठरू शकते.

चांदीप्रमाणेच सोन्याच्याही दरात मोठी घसरण नोंदवण्यात आली आहे. २४ कॅरेट सोन्याच्या दरात एका दिवसात हजारो रुपयांची घट झाली आहे. एमसीएक्सवर एप्रिल एक्सपायरी असलेल्या सोन्याच्या वायदा दरांमध्ये जोरदार घसरण पाहायला मिळाली. गुरुवारी उच्च पातळीवर असलेले सोन्याचे दर शुक्रवारी मोठ्या प्रमाणात खाली आले आहेत.

तज्ज्ञांच्या मते, सोन्या-चांदीच्या किमती अत्यंत वेगाने वाढल्याने बाजारात नफावसुली होणे अपेक्षित होते. आंतरराष्ट्रीय बाजारातील संकेत, डॉलरची हालचाल, व्याजदरांविषयीची अनिश्चितता आणि गुंतवणूकदारांची नफावसुली ही या घसरणीमागची प्रमुख कारणे मानली जात आहेत.

आता पुढील काळात सोन्या-चांदीचे दर स्थिर राहतात की पुन्हा चढउतार पाहायला मिळतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. गुंतवणूकदारांनी भावनिक निर्णय न घेता बाजारातील परिस्थिती आणि तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच गुंतवणूक करावी, असा सल्ला दिला जात आहे.


सम्बन्धित सामग्री