Harish Salve on CJP: देशात सध्या सुरू असलेल्या विविध आंदोलनांमागे परदेशी शक्तींचा हात असून त्यांना बाहेरून मोठा निधी पुरवला जात असल्याचा अत्यंत गंभीर दावा देशाचे ज्येष्ठ विधिज्ञ आणि माजी सॉलिसिटर जनरल हरीश साळवे (Harish Salve) यांनी केला आहे. लंडनमध्ये एका कार्यक्रमात बोलताना साळवे यांनी, भारताला अस्थिर करण्यासाठी बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंकेप्रमाणेच येथेही तशीच परिस्थिती निर्माण करण्याचा पद्धतशीर प्रयत्न सुरू असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. नरेंद्र मोदी सरकार (Modi Government) कोणत्याही दबावाखाली नमते घेत नसल्यानेच परदेशी शक्तींकडून हाकलपट्टीचे असे षडयंत्र रचले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
लंडनमध्ये बोलताना हरीश साळवे यांनी शेजारील देशांमध्ये घडलेल्या सत्ताधाऱ्यांच्या बदलांचा दाखला दिला. ते म्हणाले, ‘नेपाळमधील गोंधळ कोणी घडवून आणला? श्रीलंकेतील परिस्थितीमागे कोण होते? बांगलादेशात शेख हसीना यांना सत्तेवरून हटवून स्वतःच्या पसंतीचे पंतप्रधान बसवण्यामागे कोणाचा हात होता? याबद्दल मनात कोणतीही शंका बाळगण्याचे कारण नाही. नेमकी तीच परिस्थिती आता भारतात निर्माण करण्याचा पद्धतशीर प्रयत्न सुरू आहे.’ अमेरिकेसारख्या महासत्ता भारतावर नाराज असल्याचा दावा करत त्यांनी सांगितले की, भारताचे आर्थिक धोरण आणि स्वतंत्र परराष्ट्र धोरणामुळे अमेरिका आणि काही पाश्चात्त्य देश खूश नाहीत. अर्थमंत्र्यांनीही कॅनडासोबतच्या चर्चा आणि मुक्त व्यापार कराराबाबत (FTA) अमेरिकेची भूमिका एका विशिष्ट स्तरावर थांबल्याचे स्पष्ट केले होते, असे त्यांनी निदर्शनास आणले.
हे देखील वाचा: ‘पुढच्या काळातही काँग्रेसचा सुपडासाफ होणार’; भाजप नेते शिवराज सिंह चौहान यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
देशात अचानक उदयास आलेल्या काही परदेशी चेहऱ्यांवर आणि यूट्यूबर्सवर ताशेरे ओढताना साळवे यांनी प्रश्न उपस्थित केला. ‘दीपकजी कोण आहेत? सौरव दास (यू ट्यूबर) कोण आहे? तो जर्मन नागरिक आहे. हे सर्व लोक अचानक परदेशी नेते कसे बनतात? त्यांना एवढा पैसा कुठून मिळतो?’ असा सवाल त्यांनी केला. गेल्या 6 ते 8 महिन्यांत देशात दिसून येत असलेला हा पॅटर्न अत्यंत सुनियोजित असल्याचा दावा त्यांनी केला. ‘मोदी सरकार कोणत्याही दबावाखाली झुकत नाही, म्हणूनच त्यांना सत्तेवरून हटवून स्वतःच्या आवडीची आणि मित्रांची सत्ता आणण्याचा हा परदेशी कट आहे. यात माझ्या मनात कोणतीही शंका नाही. यावर वेळीच तोडगा काढणे ही सरकारची जबाबदारी आहे,’ असेही साळवे यांनी नमूद केले.
देशातील सर्वोच्च कायदेतज्ज्ञांपैकी एक असलेल्या हरीश साळवे यांनी 1999 ते 2002 या काळात भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणून काम पाहिले आहे. पाकिस्तानात चुकीच्या पद्धतीने फाशीच्या शिक्षेचीटात अडकवलेले माजी भारतीय नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयात (ICJ) भारताची बाजू अत्यंत यशस्वीपणे मांडणारे ते मुख्य वकील आहेत. वोडाफोन कर विवाद आणि अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या खटल्यांमध्ये त्यांनी सरकार व बड्या कंपन्यांचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांच्या या कायदेशीर आणि राजकीय योगदानासाठी 2015 मध्ये त्यांना ‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.