ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या राजगड किल्ल्यावर एक दुर्दैवी घटना घडली आहे. किल्ला सर करताना 35 वर्षीय पर्यटकाची प्राणज्योत मालवली आहे. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
काय घडले नेमके?
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हेश खंडाळकर असे या पर्यटकाचे नाव असून ते मूळचे हडपसर येथील रहिवासी होते. ते काही मित्रांसोबत राजगड किल्ला सर करण्यासाठी आले होते. ते बालेकिल्ल्याकडील चढाईच्या मार्गाने वर जात होते.
किल्ल्याच्या मध्यावर पोहोचल्यानंतर अचानक त्यांना चक्कर आल्यासारखे वाटले आणि ते जागीच बेशुद्ध पडले. त्यांच्यासोबत असलेल्या मित्रांनी आणि इतर पर्यटकांनी तात्काळ आरडाओरडा करून मदत मागितली.
हेही वाचा – साडेपाच वर्षांचं नातं, ती दरीत कोसळली, पण…, इंजिनियर तरुणीच्या प्रकरणात ट्विस्ट! प्रियकराचा जबाब पण चॅट हिस्ट्रीतून वेगळीच कहाणी समोर
ही बाब लक्षात येताच पुरातत्व विभागाचे कर्मचारी, महावितरणचे कर्मचारी आणि स्थानिक ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जिल्हेश यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन उपस्थितांनी त्यांना स्ट्रेचरच्या साहाय्याने गडाखाली आणण्यास सुरुवात केली. अत्यंत कठीण असलेल्या पायवाटेवरून त्यांना खाली आणणे हे मोठे आव्हान होते, तरीही सर्वांच्या मदतीने त्यांना वेल्हे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच डॉक्टरांनी तपासणी करून त्यांची प्राणज्योत मालवल्याचे घोषित केले. उपचार सुरू होण्याआधीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता.
या घटनेमुळे ट्रेकर्समध्ये हळहळ व्यक्त होत आहे. विशेषत: तरुण वयात अशी घटना घडल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे.