मुंबई: 'कौन बनेगा करोडपती ज्युनियर'च्या मंचावर भोपाळच्या नरियलखेडा भागातील 11 वर्षांच्या जान्हवी पुरसवानी हिने फक्त आपल्या बुद्धिमत्तेने नाही, तर आपल्या हाजिरजबाबीपणाने सर्वांची मने जिंकली. सामान्य परिस्थितीतून आलेल्या जान्हवीने केवळ 90 सेकंदांत 10 प्रश्नांची बरोबर उत्तरं देत पाच लाख रुपये जिंकले.
जान्हवीच्या कुटुंबाने खूप संघर्ष केला असून तो हृदय पिळवटून टाकणारा आहे. जान्हवीचे वडील चेतन पुरसवानी दिव्यांग आहेत आणि ते कसेबसे ट्रेनमध्ये साबण, टूथपेस्ट आणि ब्रश विकून कुटुंबाला आधार देतात. आई मीना पुरसवानी अगरबत्तीच्या कारखान्यात काम करतात. त्यांना रोज 200 ते 250 रुपये मजुरी मिळते. हे कुटुंब दोन खोल्यांच्या भाड्याच्या घरात राहते. या सगळ्या आर्थिक अडचणींवर मात करून जान्हवीने केबीसीच्या हॉटसीटवर पोहोचणे ही मोठी गोष्ट आहे.
कार्यक्रमादरम्यान जान्हवीच्या बोलक्या स्वभावाने सर्वांनाच हसू आवरवले नाही. अमिताभ बच्चन यांनी जेव्हा तिला प्रश्न विचारला, तेव्हा जान्हवी निरागसपणे म्हणाली, "सर, टीव्हीवर पाहते, तेव्हा तुम्ही जास्त चांगले दिसता. आता मला खात्री झाली की, तुम्ही व्हिडिओमध्ये फिल्टर वापरता".
हेही वाचा: Jhund Actor Death: नागपूर हादरलं! ‘झुंड’ चित्रपटातील अभिनेता प्रियांशू उर्फ बाबू छेत्री याचा निर्घृण खून
90 सेकंदांत 10 प्रश्नांची अचूक उत्तरे
'सुपर संदूक' फेरीत 90 सेकंदांत 10 प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन जान्हवीने सर्वांना आश्चर्यचकित केले. यानंतर जान्हवीने म्हटले की, "अमिताभ सर म्हणाले होते की, जर सर्व उत्तरे बरोबर दिली, तर तुला घरी जेवायला बोलावू! आता ते स्वतः फोन करून बोलावतील".
तिच्या आईने सांगितले की, जान्हवीच्या वडिलांनी तीन वर्षांपासून तिच्यासाठी रजिस्ट्रेशन केले होते. यावर्षी जेव्हा जान्हवीची निवड झाल्याचा फोन आला, तेव्हा वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. जान्हवी आता डॉक्टर बनून कुटुंबाचे नाव रोशन करण्याचे स्वप्न पाहत आहे. जान्हवीचे शिक्षक अनमोल अग्रवाल यांनी सांगितले की, तिने रात्री उशिरापर्यंत ऑनलाईन क्लासमध्ये सराव केला. तिच्या शिक्षिकेने तिच्या शिस्तबद्ध आणि आत्मविश्वासपूर्ण स्वभावाचे कौतुक केले आहे.