महाराष्ट्रात कानाकोपऱ्यातून लालपरी धावते. गावागावात लालपरीचा एक वेगळाच दबदबा असलेला पाहायला मिळतो. अशातच आता लालपरीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने एक महत्त्वाकांक्षी नवीन सीसीटीव्ही प्रकल्प हाती घेतला आहे. याबद्दलची माहिती परिवहन मंत्री एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
सरनाईकांनी सांगितले की, प्रवाशांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी 111 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीच्या सहाय्याने एसटीच्या बसस्थानके, आगार, विभागीय कार्यशाळा, मध्यवर्ती कार्यशाळा, विभागीय कार्यालये तसेच मध्यवर्ती प्रशिक्षण संस्था भोसरी यांसारख्या संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच या प्रकल्पासाठी तब्बल एकूण 633 ठिकाणी तब्बल 7035 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार असून, यामुळे एसटीच्या प्रत्येक हालचालीवर सतत डिजिटल नजर राहणार आहे.
पायलट प्रोजेक्ट :
प्रकल्पाच्या पायलट प्रोजेक्टमध्ये मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर विभागातील 64 महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही प्रणाली यशस्वीरित्या बसविण्यात आली आहे. यामुळे सुरक्षेची नवी दिशा निश्चित झाली आहे. उर्वरित 27 विभाग, तसेच विविध कार्यशाळा आणि कार्यालयांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याची पुढील कार्यवाही सध्या वेगाने सुरू आहे. या प्रकल्पामुळे प्रवाशांचा विश्वास अधिक दृढ होणार असून, कोणत्याही अनुचित घटनांवर त्वरित नियंत्रण ठेवणे शक्य होणार आहे.
प्रकल्पाची जबाबदारी कोणाकडे?
या प्रकल्पाची जबाबदारी ई-निविदा प्रक्रियेद्वारे निवडलेल्या टेलिकम्युनिकेशन कन्सल्टंट इंडिया लिमिटेड (TCIL) या अनुभवी संस्थेकडे सोपविण्यात आली आहे. त्यांच्या माध्यमातून प्रकल्पाची अंमलबजावणी वेगाने आणि प्रभावीपणे सुरू असून, या प्रकल्पाचा एकूण कालावधी 1 वर्ष निश्चित करण्यात आला आहे.