मुंबई, दि. 19 ऑक्टोबर – नैऋत्य मान्सूनने 8 ऑक्टोबरला राज्यातून माघार घेतली असली तरी राज्यात पावसाळी वातावरण कायम आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) आज राज्यातील 17 जिल्ह्यांसाठी पावसाचा इशारा दिला आहे. हवामान विभागाच्या आजच्या माहितीनुसार, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे.
कोणत्या जिल्ह्यांना इशारा?
यलो अलर्ट (वादळी वारा 30-40 किमी वेगासह): रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, धाराशिव, बीड, लातूर, नागपूर आणि गडचिरोली.
तुरळक ठिकाणी विजांसह पाऊस: अहिल्यानगर, सांगोला, परभणी, सिन्नर आणि नांदेड.
काल कोठे झाला पाऊस?
काल झालेल्या पावसात पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडीत 70 मिमी, सांगलीतील कुकाडेवाडी आणि कवठेमहाकाळ येथे 50 मिमी, तर सिरकाव येथे 40 मिमी पावसाची नोंद झाली. कोकणातील वैभववाडी आणि चिपळूण येथेही 10 मिमी पाऊस झाला.
महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update
राज्यात उष्णतेची लाट
दुसरीकडे राज्यात उन्हाचा चटका कायम आहे. काल दिवसाचे सर्वाधिक तापमान यवतमाळ येथे 37.3 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. अकोला आणि छत्रपती संभाजीनगर येथे 36.9 अंश, तर जळगाव येथे 36.4 अंश तापमान होते. पुणे, बीड, चंद्रपूर आणि वाशिम येथे पारा 36 अंशांवर पोहोचला आहे.
मुंबईचे हवामान
मुंबईत आज मुख्यतः निरभ्र आकाश राहील. कमाल तापमान 34 अंश आणि किमान 28 अंश राहण्याचा अंदाज आहे. मात्र हवेत आर्द्रता जास्त असल्याने उकाडा 40 ते 42 अंशापर्यंत जाणवणार आहे.