राज्यात विविध भागांमध्ये वातावरणात अचानक मोठा बदल झाला असून, गेल्या काही दिवसांपासून तीव्र उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. हवामान विभागाने राज्यातील तब्बल 12 जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता वर्तवत ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. विशेष म्हणजे, या पावसादरम्यान वाऱ्याचा वेग देखील तीव्र असणार असून, काही ठिकाणी ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. अचानक होत असलेल्या या परिवर्तनामुळे उकाड्यापासून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असला, तरी हवामान खात्याच्या या इशाऱ्यामुळे शेतकरी वर्गात मात्र चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे.
विदर्भातील जिल्ह्यांत पावसाचा इशारा
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 19 ऑक्टोबर रोजी राज्यातील 12 प्रमुख जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे. यामध्ये रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांचा समावेश असून, तिथे विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागात वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किलोमीटर राहण्याचा अंदाज आहे. याशिवाय पुणे जिल्हा आणि घाट परिसर, कोल्हापूर व घाट परिसर, सातारा व घाट परिसर, सांगली, बीड, लातूर तसेच धाराशिव या जिल्ह्यांमध्येही वादळी वाऱ्यासह पाऊस पडू शकतो. विदर्भातील गडचिरोली आणि नागपूर जिल्ह्यासाठीदेखील याच दिवशी यलो अलर्ट देण्यात आला असून, काही भागांत वाऱ्याचा वेग 30 ते 40 किलोमीटर प्रतितास राहू शकतो.
तीन जिल्ह्यांत यलो अलर्ट
दरम्यान, 20 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर, कोल्हापूर घाट परिसर, नागपूर आणि गडचिरोली या तीन जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता कायम राहणार असून, त्यानंतर उर्वरित राज्यात वातावरण कोरडे होण्याची शक्यता आहे. दरम्यान, हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनीदेखील 20 ते 25 ऑक्टोबर दरम्यान राज्यात परतीचा पाऊस सक्रिय होण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यांच्या मते, हा परतीचा पाऊस दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण किनारपट्टीसह खान्देश, मराठवाडा आणि विदर्भातील सर्वच भागांत हजेरी लावेल. हा या वर्षाचा अखेरचा पाऊस असणार असून, काही ठिकाणी रिमझिम तर काही ठिकाणी शेतात पाणी साचेल इतका पाऊस पडेल. हा पाऊस रब्बी हंगामातील पिकांच्या पेरणीसाठी अत्यंत निर्णायक ठरणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.