केमिकल कारखान्यात भीषण स्फोट; 15 किमी अंतरापर्यंत हादरली जमीन, 5 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू

भरूच येथील 'सायखा जीआयडीसी' (GIDC) परिसरात असलेल्या 'सिनझील फार्माकेम' (Synzeal Pharmachem) या रासायनिक कारखान्यात शुक्रवारी रात्री उशिरा भीषण स्फोट झाला.

केमिकल कारखान्यात भीषण स्फोट; 15 किमी अंतरापर्यंत हादरली जमीन, 5 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू
Bharuch chemical factory explosion

गुजरात राज्यातील भरूच जिल्ह्यातून एक अत्यंत भयानक आणि दुर्दैवी बातमी समोर आली आहे. भरूच येथील ‘सायखा जीआयडीसी’ (GIDC) परिसरात असलेल्या ‘सिनझील फार्माकेम’ (Synzeal Pharmachem) या रासायनिक कारखान्यात शुक्रवारी रात्री उशिरा भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत 5 कामगारांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून, अन्य 5 कामगार गंभीर जखमी झाले आहेत. हायड्रोजनेशन प्रक्रियेदरम्यान हा भीषण स्फोट घडल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. या घटनेमुळे संपूर्ण औद्योगिक क्षेत्रात मोठी घबराट पसरली आहे.

हेही वाचा – देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला! ट्रॅव्हलर बस 15 फूट खोल खड्ड्यात कोसळली; 8 जणांचा मृत्यू

15 किलोमीटर दूरपर्यंत स्फोटाचे तीव्र धक्के

अग्निशमन दल आणि प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट रात्री सुमारे 11:00 च्या सुमारास झाला. स्फोटाची तीव्रता इतकी प्रचंड होती की, त्याचा भीषण आवाज सुमारे 15किलोमीटरच्या परिसरात स्पष्टपणे ऐकू आला. कारखान्यापासून जवळपास 200 मीटर अंतरावर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरचा टायर धक्क्याने फुटला, तर लगतच्या इतर कारखान्यांच्या इमारतींना हादरे बसले. स्फोटानंतर विषारी गॅस गळती झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, आसपासच्या नागरिकांनी डोळे जळजळत असल्याची तक्रार केली. स्फोटाच्या वेळी कारखान्यात सुमारे 20 कामगार कार्यरत होते.

कारखान्याचे कामकाज तात्काळ बंद

अपघाताची बातमी मिळताच भरूचच्या उपविभागीय दंडाधिकारी (SDM) मनीषा मनानी, स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. भरूचचे जिल्हाधिकारी एन. के. गवहाणे यांनी स्पष्ट केले की, कंपनीला नोटीस बजावण्यात आली असून पुढील आदेशापर्यंत कारखान्याचे सर्व कामकाज पूर्णपणे थांबवण्यात आले आहे. या दुर्घटनेत भाविक वसावा, अर्जुन कुमार, अनिकेत कुमार, जयदीप पटेल आणि वृंद तलाविया या 5 कामगारांचा मृत्यू झाला आहे, तर जखमी प्रियांशू कुमार, पवन कुमार, प्रतीक प्रजापती, मौसम कुमार आणि शिव दयाल यांच्यावर भरूचमधील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अवघ्या मे महिन्यात सुरू झालेल्या या नवीन कारखान्यातील सुरक्षा यंत्रणेवर आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असून, औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य विभागाने या प्रकरणाच्या चौकशीला सुरुवात केली आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number