भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना अचानक प्रकृती अस्वास्थ्यामुळे दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शुक्रवारी संध्याकाळी सुमारे 7:30 च्या सुमारास छातीत तीव्र वेदना आणि संसर्ग झाल्याची तक्रार केल्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात आणण्यात आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून डॉक्टरांनी त्यांना थेट आयसीयू (ICU) विभागात हलवले. वरिष्ठ न्यूरोलॉजिस्ट डॉ. विनीत सुरी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरांचे विशेष पथक त्यांच्यावर उपचार करत असून रुग्णालयाने जारी केलेल्या अधिकृत आरोग्य पत्रकानुसार (Health Bulletin) सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी रुग्णालयाला भेट देऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी केली.
काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान मोदींनी घेतली होती सदिच्छा भेट
अडवाणी यांची प्रकृती बिघडण्याच्या अवघ्या आठवडाभरापूर्वी, म्हणजेच 7 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. आपल्या सार्वजनिक कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी लालकृष्ण अडवाणींचे आशीर्वाद घेतले होते.
या भेटीनंतर मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर (X) विशेष पोस्ट शेअर करत अडवाणींच्या राष्ट्रसेवेतील आणि देश उभारणीतील अमूल्य योगदानाचा आदरपूर्वक उल्लेख केला होता. अडवाणींच्या मार्गदर्शनामुळे आपल्या राजकीय आणि सामाजिक जीवन प्रवासावर मोठा प्रभाव पडल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले होते.
Delhi | Union Health Minister JP Nadda met veteran BJP leader Lal Krishna Advani, who is admitted to Apollo Hospital, and enquired about his health. (File photos) https://t.co/HcoozociUl — ANI (@ANI) October 17, 2026
हेही वाचा – Air India चा मोठा झटका! विमानसेवा बंद राहणार, प्रवाशांना मिळणार कोणते पर्याय?
भारतीय राजकारणातील देदीप्यमान कारकीर्द
दरम्यान, 98 वर्षीय लालकृष्ण अडवाणी यांची राजकीय कारकीर्द अत्यंत प्रदीर्घ आणि प्रभाव पाडणारी राहिली आहे. भारतीय जनता पक्षाला राष्ट्रीय स्तरावर एक प्रमुख राजकीय शक्ती म्हणून उभारण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी 2002 ते 2004 या कालावधीत भारताचे उपपंतप्रधान म्हणून जबाबदारी सांभाळली होती. याशिवाय केंद्रीय गृहमंत्री आणि माहिती व प्रसारण मंत्री यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या मंत्रिपदांवर त्यांनी यशस्वीपणे काम केले आहे. आपल्या प्रदीर्घ संसदीय कारकिर्दीत त्यांनी 4 वेळा राज्यसभा सदस्य म्हणून तर 7 वेळा लोकसभा सदस्य म्हणून संसदेत प्रतिनिधित्व केले आहे.