वसई प्रतिनिधी-जयराज राजीवडे
नालासोपारा : नालासोपारा पूर्वेकडील इम्पेरियल हाइट्स इमारतीला रात्री साडेअकराच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. या दुर्घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले असून 20 ते 25 नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. मात्र, नागरिकांना वाचवताना अग्निशमन दलाची मोठी दमछाक झाली. इमारतीतील अग्निशमन यंत्रणा कुचकामी ठरली का? तसेच इमारतीच्या आजूबाजूला जागा कमी असल्याने बचावकार्यात अडथळे का निर्माण झाले? असे सवाल आता उपस्थित होत आहेत.
नेमकी घटना घडली कशी?
मिळालेल्या माहितीनुसार, नालासोपारा पूर्वेकडील इम्पेरियल हाइट्स इमारतीत रात्री 11 ते 11.30 च्या सुमारास आग लागली. सुरुवातीला मीटर रूममध्ये लागलेली आग प्लायवूडच्या पॅकिंगमुळे वेगाने पसरल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आगीने इतर मजल्यांवरही पसरल्यानंतर अग्निशमन दल, पोलीस आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.
सातव्या, नवव्या तसेच बाराव्या, तेराव्या आणि चौदाव्या मजल्यांवरील नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. या दुर्घटनेत दोन जण गंभीर जखमी झाले असून, सुमारे 20 ते 25 नागरिकांची सुखरूप सुटका करण्यात आली. बचावकार्यात स्थानिक नागरिकांनीही मदत केली. अतिरिक्त मदतीसाठी मीरा-भाईंदर येथूनही अग्निशमन दलाच्या गाड्या मागवण्यात आल्या.
मात्र, या घटनेमुळे इमारतीच्या अग्निसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. इमारतीच्या आजूबाजूला जागा कमी असल्याने रेस्क्यू ऑपरेशनदरम्यान अडथळे निर्माण झाले. त्यामुळे इमारतीला परवानगी देताना महापालिकेने अग्निशमन दलाच्या वाहनांच्या हालचालींसाठी पुरेशी जागा आणि सुरक्षेच्या निकषांची तपासणी केली होती का? इमारतीत बसवण्यात आलेली अग्निशमन यंत्रणा वेळीच उपयोगी का पडली नाही? तसेच इमारतीचे फायर ऑडिट झाले होते का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
नागरिकांचं रिजेन्सी हॉटेलमध्ये स्थलांतर
या दुर्घटनेमुळे बाधित झालेल्या नागरिकांना तात्पुरत्या स्वरूपात जवळील रिजेन्सी हॉटेलमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. आगीचे नेमके कारण, अग्निशमन यंत्रणेची स्थिती आणि सुरक्षेच्या नियमांचे पालन झाले होते का, याबाबत अधिकृत तपासानंतरच स्पष्टता येणार आहे.