मुंबई: मुंबईतील साकीनाका परिसरात भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. अंधेरी पूर्व येथील खैराणी रोडवरील गोदामात लागलेल्या या आगीमुळे परिसरात खळबळ उडाली. या दुर्घटनेत चार जण गंभीर भाजल्याची माहिती असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (20 ऑक्टोबर) सायंकाळी साकीनाका येथील अब्दुल रशीद कंपाउंड परिसरातील भंगाराच्या गोदामाला आग लागली. आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. आगीची तीव्रता लक्षात घेऊन अग्निशमन दलाने लेव्हल-2प्रकारची आग घोषित केली.
आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तसेच पोलीस, रुग्णवाहिका आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनीही मदतकार्य सुरू केले.
चौघे गंभीर भाजल्याची माहिती
या दुर्घटनेत चार जण भाजल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना सुमारे ४० ते ५० टक्के भाजल्याचे सांगण्यात येत असून, उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींची प्रकृती आणि घटनेबाबत अधिक माहिती मिळण्याची प्रतीक्षा आहे.
आगीचे कारण अद्याप अस्पष्ट
गोदामाला आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आगीमुळे गोदामातील साहित्याचे किती नुकसान झाले, याचीही माहिती समोर आलेली नाही. अग्निशमन दलाकडून आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.