Ubaidullah Rajput: भारत-पाकिस्तान सामना कुठेही असो, तो नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. मात्र यावेळी मैदानावर घडलेल्या एका घटनेमुळे पाकिस्तानात मोठा गोंधळ उडाला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिद्ध पाकिस्तानी कबड्डी खेळाडू उबैदुल्लाह राजपूत याचा 16 डिसेंबर रोजी बहरीनमध्ये झालेल्या एका खाजगी स्पर्धेतील व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या दृश्यांमध्ये तो भारतीय जर्सी परिधान करून भारतीय ध्वज फडकावत सामन्यात खेळताना दिसत आहे.
पाकिस्तान कबड्डी फेडरेशनची आपत्कालीन बैठक
या प्रकरणानंतर पाकिस्तान कबड्डी फेडरेशन (पीकेएफ) ने तत्काळ दखल घेतली असून, सचिव राणा सरवर यांनी 27 डिसेंबर रोजी आपत्कालीन बैठक बोलावली आहे. बहरीनमधील जीसीसी या खाजगी स्पर्धेत उबैदुल्लाहसह पाकिस्तान संघातील इतर काही खेळाडूंनीही सहभाग घेतला होता. त्यामुळे या सर्वांवर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, एका वृत्तसंस्थेला दिलेल्या निवेदनात राणा सरवर म्हणाले, 'ही स्पर्धा खाजगी होती. आयोजकांनी भारत, पाकिस्तान, कॅनडा, इराण अशा नावांनी खाजगी संघ तयार केले होते. प्रत्येक संघात त्या-त्या देशांतील खेळाडू होते. भारतीय खेळाडूंनी भारतीय खाजगी संघाचे प्रतिनिधित्व केले, मात्र उबैदुल्लाहने भारताकडून खेळणे आम्हाला मान्य नाही.'
उबैदुल्लाहची माफी आणि स्पष्टीकरण
व्हायरल व्हिडिओनंतर उबैदुल्लाह राजपूतने माफी मागत स्पष्टीकरण दिले आहे. 'मला बहरीनमधील या खाजगी स्पर्धेसाठी आमंत्रित करण्यात आले होते. मला ज्या संघात समाविष्ट करण्यात आले, त्याचे नाव भारतीय संघ आहे, हे नंतर समजले. मी आयोजकांना भारत-पाकिस्तान अशी नावे वापरू नयेत, असे सांगितले होते,' असे त्याने स्पष्ट केले. या घटनेमुळे क्रीडा क्षेत्रात आणि सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, पीकेएफच्या बैठकीनंतर पुढील कारवाईबाबत स्पष्टता येण्याची शक्यता आहे.