PAN Card Number Details : बँक खाते उघडण्यापासून ते इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्यापर्यंत प्रत्येक आर्थिक व्यवहारासाठी पॅन कार्ड (PAN Card) अनिवार्य आहे. या लॅमिनेटेड कार्डवर असलेला 10 अंकी अल्फान्यूमेरिक नंबर हा केवळ एक आकडा किंवा अक्षरे आणि अंकांचा समूह नसून, ती तुमची संपूर्ण आर्थिक कुंडली असते. आयकर विभागाने जारी केलेल्या या नंबरमधील प्रत्येक अक्षराचा आणि अंकाचा एक विशिष्ट अर्थ दडलेला असतो, जो तुमच्या ओळख आणि आर्थिक स्थितीबद्दल माहिती देतो.
पहिले तीन अंक: सिरीजची ओळख
पॅन कार्ड क्रमांकाची सुरुवात इंग्रजीतील तीन अक्षरांनी होते. ही अक्षरे AAA पासून ZZZ पर्यंत कोणतीही असू शकतात. ही सिरीज आयकर विभागाद्वारे सध्या सुरू असलेल्या क्रमानुसार ठरवली जाते. हे तीन अंक विभागाच्या अंतर्गत डेटाबेस व्यवस्थापनासाठी वापरले जातात आणि त्यातून कार्डधारकाची वैयक्तिक माहिती मिळत नाही.
चौथा अंक: तुमची कायदेशीर श्रेणी (Status)
पॅन कार्डचा चौथा अंक हा सर्वात महत्त्वाचा मानला जातो, कारण तो कार्डधारकाची श्रेणी किंवा 'स्टेटस' दर्शवतो. यामध्ये खालीलपैकी एक अक्षर असते:
P - वैयक्तिक (Individual Person)
F - फर्म (Firm)
C - कंपनी (Company)
A - व्यक्तींची संघटना (Association of Persons)
T - ट्रस्ट (Trust)
H - हिंदू अविभक्त कुटुंब (HUF)
G - सरकारी संस्था (Government)
L - स्थानिक संस्था (Local Authority)
J - कृत्रिम न्यायिक व्यक्ती (Artificial Juridical Person)
हेही वाचा - DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी! महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ; 'या' तारखेपासून खात्यात जमा होणार वाढीव पगार
पाचवे अक्षर: तुमचे आडनाव
पॅन कार्ड क्रमांकातील पाचवे अक्षर हे कार्डधारकाच्या ओळखीशी थेट संबंधित असते. हे अक्षर तुमच्या आडनावाचे पहिले अक्षर असते. उदाहरणार्थ, जर तुमचे आडनाव 'कदम' असेल, तर पाचवे अक्षर K असेल. संस्था किंवा कंपन्यांच्या बाबतीत, त्यांच्या नावाचे पहिले अक्षर येथे वापरले जाते. विशेष म्हणजे, आयकर विभाग आपल्या डेटाबेसमध्ये कार्डधारकाची नोंद त्याच्या आडनावावरूनच करतो.
शेवटचे पाच अंक: सिरीज आणि चेक डिजिट
पाचव्या अक्षरानंतर पुढील चार अंक हे 0001 ते 9999 या दरम्यानचे कोणतेही आकडे असू शकतात. हे अंक त्यावेळच्या सीरिजनुसार दिले जातात. पॅन कार्डचा सर्वात शेवटचा म्हणजे 10 वा अंक हा पुन्हा एक इंग्रजी अक्षर असते. याला 'अल्फाबेट चेक डिजिट' असेही म्हणतात. पॅन कार्ड हे कायमस्वरूपी असल्याने तुम्ही पत्ता बदलला तरी हा 10 अंकी क्रमांक कधीही बदलत नाही. त्यामुळे हा क्रमांक सुरक्षित ठेवणे आणि त्याचा गैरवापर टाळणे अत्यंत गरजेचे आहे.
हेही वाचा - Bank Holiday In March 2026: बँकेची कामे वेळेत उरका! मार्चमध्ये 'इतके' दिवस बँका राहणार बंद; पाहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी