नवी दिल्ली: आजकाल सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स (SIPs) द्वारे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. एसआयपीमुळे कमी रक्कम दरमहा गुंतवून मोठा निधी तयार करता येतो. मात्र, अनेकांना एसआयपीच्या विविध प्रकारांबद्दल माहिती नसते. तुमच्या गरजेनुसार योग्य एसआयपी निवडल्यास गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळवणे सोपे होते.
जर तुम्हाला समजले की, तुमच्यासाठी कोणता SIP योग्य आहे, तर तुम्हाला कधीही तोटा होणार नाही. बरेच लोक नियम व्यवस्थित समजून न घेता किंवा गोंधळलेल्या स्थितीत गुंतवणूक करतात. नंतर प्रत्यक्ष योजना सुरू झाल्यानंतर हळूहळू यातील तपशील समजू लागतात. यासाठी नव्या गुंतवणूकदारांनी खालील बाब समजून घेणे महत्त्वाचे आहे.
एसआयपीचे मुख्य प्रकार खालीलप्रमाणे आहेत:
1. नियमित एसआयपी (Regular SIP)
ही एसआयपी अशा लोकांसाठी आहे, ज्यांना ठराविक वेळी निश्चित उत्पन्न मिळते आणि महिन्याला थोडी रक्कम बाजूला ठेवता येते. यामध्ये, तुम्ही दर महिन्याच्या एका निश्चित तारखेला ठरवलेली रक्कम गुंतवण्यास सुरू करू शकता. यामुळे शिस्तबद्ध पद्धतीने बचत होते आणि हळूहळू एक मोठा निधी तयार होतो. या प्रकारच्या एसआयपीची सुरुवात तुम्ही फक्त 500 रुपयांपासून करू शकता. याला नियमित एसआयपी म्हणतात.
हेही वाचा - EPFO Withdrawal Rules: आता PF काढणे आणखी सोपे होणार! सरकारच्या नव्या प्रस्तावाचा 7 कोटी पीएफ सदस्यांना मिळणार फायदा
2. लवचिक एसआयपी (Flexible SIP)
हे एसआयपी खासकरून फ्रीलांसर, छोटे व्यावसायिक किंवा ज्यांचे उत्पन्न अनियमित असते त्यांच्यासाठी योग्य आहे. यामध्ये, तुम्ही तुमच्या उत्पन्नानुसार गुंतवणुकीची रक्कम कमी-जास्त करू शकता. जेव्हा तुमचे उत्पन्न जास्त असेल, तेव्हा तुम्ही जास्त पैसे गुंतवू शकता आणि जेव्हा उत्पन्न कमी असेल, तेव्हा तुम्ही गुंतवणुकीची रक्कम कमी करू शकता. या प्रकाराला लवचिक एसआयपी म्हणतात.
3. स्टेप-अप एसआयपी (Step-up SIP)
नोकरी करणाऱ्यांसाठी किंवा ज्यांचे उत्पन्न दरवर्षी वाढत असते, त्यांच्यासाठी हा प्रकार उत्तम आहे. या एसआयपीमध्ये तुम्ही गुंतवणुकीची रक्कम वेळोवेळी वाढवू शकता (उदा. दरवर्षी 5 टक्के किंवा10 टक्क्यांनी). यामुळे दीर्घकाळात महागाईवर मात करत एक मोठा निधी तयार होतो. घर खरेदी, मुलांचे शिक्षण किंवा निवृत्तीसाठी निधी जमा करण्यासाठी हे फायदेशीर ठरते.
4. विम्यासह एसआयपी (SIP with Insurance)
जर तुम्हाला बचत आणि विम्याचे संरक्षण दोन्ही हवे असेल, तर हा पर्याय निवडू शकता. यामध्ये, तुम्हाला गुंतवणूक आणि विमा दोन्हीचा फायदा मिळतो. यासाठी तुम्हाला वेगळे विमा प्रीमियम भरावे लागत नाहीत. जर एसआयपी सुरू असताना गुंतवणूकदाराचा मृत्यू झाला, तर विम्याची रक्कम वारसदाराला दिली जाते, ज्यामुळे कुटुंबाला आर्थिक सुरक्षा मिळते.
हेही वाचा - Free LPG Connection: नवरात्रीत मोदी सरकारचा मोठा निर्णय! 25 लाख महिलांना मिळणार मोफत एलपीजी कनेक्शन
5. ट्रिगर एसआयपी (Trigger SIP)
जे गुंतवणूकदार शेअर बाजारातील चढ-उतार समजून घेऊ शकतात आणि थोडी जोखीम घेऊ इच्छितात, त्यांच्यासाठी ही एसआयपी आहे. यामध्ये, तुम्ही आधीच काही विशिष्ट परिस्थिती (उदा. निर्देशांक एका विशिष्ट पातळीवर पोहोचणे) ठरवता, ज्यानुसार आपोआप पैसे गुंतवले जातात किंवा काढले जातात. ट्रिगर एसआयपीचे अनेक प्रकार आहेत, जसे की इंडेक्स लेव्हल ट्रिगर, फिक्स्ड डेट ट्रिगर, रिटर्न बेस्ड ट्रिगर, प्रॉफिट-बुकिंग ट्रिगर इत्यादी