कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आपल्या सदस्यांच्या सुविधेसाठी सातत्याने नवे निर्णय घेत आहे. याच पार्श्वभूमीवर, सरकार आता पीएफ ऑटो सेटलमेंटसाठीची मर्यादा वाढवण्याच्या तयारीत आहे. आतापर्यंत ही मर्यादा 1लाख रुपये होती, पण आता ती थेट 5 लाख रुपयांपर्यंत नेण्यात येणार असल्याचे समजते. ही प्रक्रिया ‘ऑटो सेटलमेंट मोड’ अंतर्गत करण्यात येणार आहे, म्हणजेच यासाठी मानवी हस्तक्षेपाची गरज भासणार नाही. याचा थेट फायदा म्हणजे, तुमचा पीएफ विथड्रॉवल क्लेम अधिक वेगाने, अचूकपणे आणि पारदर्शकपणे मंजूर होईल. केंद्रीय मंत्री शोभा करंदलाजे यांनी नुकतेच लोकसभेत माहिती दिली की, सध्या 60% पेक्षा जास्त अॅडव्हान्स क्लेम या ऑटो सेटलमेंट प्रणालीद्वारे यशस्वीरित्या प्रक्रिया होत आहेत.
या निर्णयामागील उद्दिष्ट म्हणजे पीएफ सदस्यांना आपत्कालीन किंवा अत्यावश्यक गरजांसाठी जलद आणि सोपी आर्थिक मदत उपलब्ध करून देणे. EPFO ने काही वर्षांपूर्वीच अॅडव्हान्स क्लेमसाठी ऑटो सेटलमेंट मोड सुरू केला होता, आणि त्याला चांगला प्रतिसादही मिळाला. शिक्षणासाठी, लग्नासाठी, वैद्यकीय उपचारांसाठी किंवा घर खरेदीसाठी लागणाऱ्या खर्चाच्या वेळी ही योजना अत्यंत उपयुक्त ठरते. आता 5 लाखांपर्यंतची रक्कम ऑटो सेटलमेंट मोडने काढता येणार असल्याने, बँकेत चकरा मारण्याची किंवा कागदपत्रांची जटिल प्रक्रिया पार पाडण्याची गरज भासणार नाही.
हेही वाचा: EPFO Passbook: झटपट पीएफ बॅलन्स जाणून घेण्यासाठी फॉलो करा 'या' 5 पद्धती
मिळालेल्या माहितीनुसार, श्रम व रोजगार मंत्रालयाच्या सचिव सुमिता डावरा यांनी श्रीनगर येथे पार पडलेल्या EPFO च्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या (CBT) 113 व्या बैठकीत या मर्यादा वाढीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. ही शिफारस आता CBT कडे अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात येणार आहे. मंजुरी मिळाल्यानंतर, कोट्यवधी पीएफ सदस्यांना शिक्षण, विवाह, आरोग्य खर्च किंवा गृहखरेदीसाठी त्यांच्या खात्यातून ऑटो सेटलमेंटद्वारे 5 लाख रुपयांपर्यंत रक्कम काढणे शक्य होईल. हा निर्णय लागू झाल्यास, पीएफ सदस्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.