NEET Exam and MBBS Admission : वैद्यकीय क्षेत्रात प्रवेश मिळवण्याचे स्वप्न अनेक तरुण पाहतात, परंतु उत्तर प्रदेशातील जौनपूरमध्ये एका 24 वर्षांच्या तरुणाने हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जे पाऊल उचलले, ते ऐकून संपूर्ण देश हादरला आहे. सूरज भास्कर असे या तरुणाचे नाव असून, त्याने NEET परीक्षेमध्ये दिव्यांग (PwD) कोठ्याचा फायदा मिळवण्यासाठी स्वतःच्या डाव्या पायाचा एक भाग स्वतःच कापून टाकला. मेडिकल ॲडमिशनमध्ये दिव्यांगांना मिळणाऱ्या कमी क्वालिफाइंग गुणांचा लाभ मिळावा आणि MBBS ला प्रवेश निश्चित व्हावा, हा यामागील एकमेव भयानक उद्देश होता.
बनावट हल्ल्याचा रचला होता बनाव
ही घटना 18 जानेवारी रोजी घडली; मात्र, सुरुवातीला सूरजने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी एक वेगळीच कथा रचली होती. दोन अज्ञात व्यक्तींनी आपल्यावर हल्ला केला आणि आपल्याला बेशुद्ध करून पाय कापला, अशी तक्रार त्याने खलीपुर (लाइन बाजार पोलीस स्टेशन) येथे नोंदवली होती. पोलिसांनी सुरुवातीला हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला, परंतु सुरजच्या बोलण्यातील विसंगतीमुळे पोलिसांचा संशय बळावला. 19 जानेवारी रोजी सकाळी जेव्हा त्याला शुद्ध आली तेव्हा फक्त टाच उरली होती, असा दावा त्याने केला होता.
प्रेयसीची चौकशी आणि सत्याचा उलगडा
सर्कल ऑफिसर गोल्डी गुप्ता यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने सुरजचे कॉल डिटेल्स (CDR) तपासले, तेव्हा तो एका महिलेच्या संपर्कात असल्याचे समोर आले. या महिलेकडे म्हणजे सूरजच्या प्रेयसीकडे चौकशी केली असता, अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. सुरजला कोणत्याही परिस्थितीत वर्ष 2026 मध्ये MBBS ला प्रवेश हवा होता आणि त्यासाठी तो अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवण्याचा खूप प्रयत्न करत होता, असे तिने सांगितले. प्रेयसीने दिलेल्या माहितीमुळे पोलिसांच्या तपासाला नवी दिशा मिळाली.
फार्मसीच्या ज्ञानाचा गैरवापर
सूरजने यापूर्वी D.Pharm (फार्मसीमधील डिप्लोमा) केला होता, ज्यामुळे त्याला वैद्यकीय उपकरणांची आणि औषधांची चांगली जाण होती. पोलिसांना एका शेतात काही इंजेक्शन्स सापडली आहेत, जी भूल देण्यासाठी (Anesthesia) वापरली जातात. असा संशय आहे की, सूरजने पाय कापण्याच्या वेदना जाणवू नयेत, म्हणून प्रथम स्वतःच्या पायाला बधीर होण्याचे इंजेक्शन दिले आणि त्यानंतर पाय अत्यंत सफाईदारपणे एका हत्याराच्या सहाय्याने कापला. त्याच्या जखमेवर कोणत्याही धारदार शस्त्राच्या खुणा नव्हत्या, जे तांत्रिकदृष्ट्या संशयास्पद होते.
हेही वाचा - Crime News : पत्नीचं भयंकर षडयंत्र! प्रियकराच्या मदतीने पतीला अडकवलं गोहत्येच्या खोट्या गुन्ह्यात
डायरीतील 'MBBS 2026' चे ध्येय
पोलिसांनी सूरजच्या घराची झडती घेतली असता त्यांना एक डायरी सापडली. या डायरीमध्ये तो आपली दैनंदिन लक्ष्ये (Goals) लिहून ठेवत असे. त्यात त्याने "Admission in MBBS in 2026" असे स्पष्टपणे लिहिले होते. याशिवाय त्याने लग्नाचा नोंदणी फॉर्मही भरून ठेवला होता. स्वतःच्या ध्येयासाठी शरीर निकामी करण्याची त्याची ही मानसिकता पाहून तपास अधिकारीही चक्रावून गेले. यापूर्वी ऑक्टोबर महिन्यातही त्याने बनावट कागदपत्रे बनवण्यासाठी बनारस हिंदू विद्यापीठात (BHU) प्रयत्न केला होता, पण तिथे त्याला यश मिळाले नाही.
तांत्रिक पुराव्यांनी उघड केली पोल
पोलिसांनी BTS आणि टावर डंप डेटा तपासला असता, त्या रात्री सूरजच्या आसपास कोणत्याही बाहेरील व्यक्तीची उपस्थिती दिसून आली नाही. पहाटे 5:00 वाजता त्याने स्वतःच कुटुंबीयांना फोन करण्याचा प्रयत्न केला होता. इलेक्ट्रॉनिक पुराव्यांनी हे स्पष्ट केले की, त्याच्यावर कोणताही बाहेरील हल्ला झाला नव्हता. तो वारंवार आपले जबाब बदलत असल्याने पोलिसांना खात्री पटली की, ही स्वतःला जखमी करून सरकारी सवलती लाटण्याची एक मोठी योजना होती.
कठोर कारवाईचे संकेत
आता या प्रकरणात सूरज भास्कर विरुद्ध पोलिसांची दिशाभूल करणे आणि स्वतःला गंभीर इजा करून सरकारी यंत्रणेला फसवण्याचा प्रयत्न करणे, या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. सवलती मिळवण्यासाठी तरुणाई कोणत्या थराला जाऊ शकते, याचे हे एक अत्यंत विदारक उदाहरण आहे. सध्या सूरजवर रुग्णालयात उपचार सुरू असून, प्रकृती सुधारल्यानंतर त्याला अधिकृतपणे अटक केली जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा - Satara Crime : भयंकर! पत्नीने पती आणि दुसऱ्या प्रियकरासोबत मिळून पहिल्या प्रियकराला संपवलं; नंतर मृतदेहाचे तुकडे करून...