गणरायाला निरोप देण्यासाठी राज्यभरात भाविकांची लगबग सुरू असतानाच महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये पावसाचे सावट निर्माण झाले आहे. राज्यात आता परतीच्या पावसाला सुरुवात झाल्याचे चित्र असून, पुढील दोन दिवसांत महाराष्ट्राच्या हवामानात काही बदल पाहायला मिळू शकतात.
बंगालच्या उपसागरातील बदलत्या हवामानाचा प्रभाव पुढील काही दिवस महाराष्ट्रावर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील काही भागांत पावसाची स्थिती कायम राहू शकते. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवामान प्रणालीमुळे पुढील काही तास महत्त्वाचे ठरणार आहे. आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी मुंबईतील विसर्जन मिरवणुकांना सकाळपासूनच सुरुवात झाली आहे.
मुंबईच्या लालबाग-परळ परिसरात विसर्जन मिरवणुकीला भाविकांमध्ये मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. असं असताना दुसरीकडे पालघर, ठाणे, मुंबईत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून, स्थानिक वातावरणानुसार पावसाचा जोर कमी-अधिक होऊ शकतो. त्यामुळे गणेशभक्तांनी विसर्जन मिरवणुकीसाठी घराबाहेर पडताना हवामानाचा अंदाज लक्षात घ्यावा आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी.
अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत ढगाळ वातावरणासह पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता असून, त्यामुळे विसर्जन मिरवणुकांवरही पावसाचा परिणाम होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
या भागात 40 ते 50 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असून, विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि हलका ते मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. तसेच विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गोंदिया, वर्धा आणि वाशिम जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली असून पुढील दोन दिवसांत महाराष्ट्राच्या हवामानात बदल होण्याची शक्यता आहे.