Job Opportunity For Indian in Russia : भारताचा पारंपरिक मित्र असलेल्या रशियामध्ये भारतीयांसाठी रोजगाराच्या प्रचंड संधी निर्माण झाल्या आहेत. रशियातील मजुरांची कमतरता भरून काढण्यासाठी आता भारतीय कामगारांची मदत घेतली जात आहे. रशियातील भारताचे राजदूत आणि रशियन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी काळात हा ओघ अधिकच वाढणार आहे.
भारतातील रशियाचे राजदूत डेनिस एलिपोव्ह यांनी नुकतेच माध्यमांशी बोलताना एक महत्त्वाची आकडेवारी जाहीर केली आहे. त्यांच्या मते, सध्या रशियामध्ये 70,000 पेक्षा जास्त भारतीय नागरिक विविध क्षेत्रांत कार्यरत आहेत. "जसे जसे उभय देशांमधील व्यावसायिक करार प्रत्यक्षात येतील, तसा हा आकडा वेगाने वाढेल," असे एलिपोव्ह यांनी स्पष्ट केले. रशिया केवळ कामगारच नव्हे, तर तज्ज्ञ व्यावसायिकांनाही आपल्या देशात सामावून घेण्यास उत्सुक आहे.
2026 मध्ये 40,000 नव्या भारतीयांची गरज
रशियाचे विशेष प्रतिनिधी बोरिस टिटोव यांनी दिलेल्या माहितीनुसार, केवळ 2026 या एकाच वर्षात किमान 40,000 भारतीय कामगार रशियात दाखल होण्याची अपेक्षा आहे. मॉस्कोमधील भारतीय राजदूत विनय कुमार यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला असून, 2025 च्या अखेरीस रशियातील भारतीयांची संख्या 70,000 ते 80,000 च्या घरात पोहोचली आहे.
या भरतीची काही प्रमुख वैशिष्ट्ये:
भरतीची क्षेत्रे: बांधकाम (Construction), शेती, उत्पादन क्षेत्र, आयटी आणि आरोग्य सेवा.
ऐतिहासिक करार: डिसेंबर 2025 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या भेटीत भारतीय कामगारांच्या स्थलांतराबाबत महत्त्वपूर्ण करार झाला होता.
अधिकृत यंत्रणा: फसवणूक टाळण्यासाठी भारतीय कामगारांची भरती आता अधिकृत सरकारी आणि नोंदणीकृत संस्थांमार्फत केली जात आहे.
हेही वाचा - Job Recruitment In Maharashtra : नोकरीची सुवर्णसंधी, राज्यात 70 हजार पदांची मेगा भरती; मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश
पगार आणि आर्थिक गणिते
रशियामध्ये कामासाठी जाणाऱ्या भारतीयांना आकर्षक पगार मिळत आहे. कमी कौशल्य असलेल्या कामगारांनाही दरमहा 475 युरो ते 950 युरोपर्यंत वेतन मिळत असून, भारतीय चलनात ही रक्कम 50,000 ते 1,00,000 रुपयांच्या दरम्यान आहे. अनेक कंपन्या पगारासोबतच राहण्याची आणि जेवणाची सोय मोफत करत असल्याने भारतीय कामगारांना मोठी बचत करणे शक्य होत आहे.
रशियाकडून भारतालाच प्राधान्य का?
युक्रेनसोबतच्या युद्धामुळे आणि पाश्चात्य देशांनी लादलेल्या निर्बंधांमुळे रशियामध्ये कुशल आणि अकुशल मजुरांची मोठी कमतरता भासत आहे. दुसरीकडे, भारतीय कामगारांची निष्ठा, कामाची पद्धत आणि कमी वेळेत नवे कौशल्य आत्मसात करण्याची वृत्ती रशियन कंपन्यांना भावली आहे. यामुळे रशियाने मध्य आशियाई देशांऐवजी आता भारताकडे आपला मोर्चा वळवला आहे. "रशियाला कामगारांची गरज आहे आणि भारताला रोजगाराची," असे समीकरण सध्या या दोन्ही मित्र देशांमध्ये पाहायला मिळत आहे.
हेही वाचा - 'पाच हजार फेरीवाल्यांचा बंद, फक्त माझा स्टॉल सुरू, ही मनसेची ताकद'; मराठमोळ्या एकताने मानले राज ठाकरेंचे आभार