Windows 11 Alert : जर तुम्ही Windows 11 वापरकर्ते असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. जानेवारी 2026 मधील नियमित अपडेटनंतर सिस्टममध्ये उद्भवलेल्या गंभीर तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी मायक्रोसॉफ्टने आता एक आपत्कालीन (Emergency) पॅच रिलीज केला आहे. प्रामुख्याने मायक्रोसॉफ्ट आउटलुक (Outlook) वारंवार क्रॅश होणे आणि क्लाउड फाइल्स हाताळताना येणाऱ्या अडथळ्यांमुळे लाखो वापरकर्त्यांना मनस्ताप सहन करावा लागत होता.
आउटलुक वापरताना होतेय मोठी अडचण
अनेकांनी तक्रार केली आहे की, त्यांचे आउटलुक अचानक बंद पडत आहे किंवा सुरूच होत नाहीये. मायक्रोसॉफ्टने अधिकृतपणे कबूल केले की, 13 जानेवारी 2026 च्या अपडेटनंतर या समस्येला सुरुवात झाली. विशेषतः ज्या युजर्सनी आपल्या महत्त्वाच्या PST फाईल्स वनड्राइव्हवर (OneDrive) सेव्ह केल्या आहेत, त्यांचे अॅप हँग होत आहे किंवा पूर्णपणे क्रॅश होत आहे. अनेकदा वापरकर्त्यांना टास्क मॅनेजरचा आधार घेऊन किंवा सिस्टम रीस्टार्ट करून काम करावे लागत आहे.
हेही वाचा - WhatsApp Paid Version: आता व्हॉट्सॲप वापरण्यासाठी पैसे मोजावे लागणार? नेमका काय आहे सबस्क्रिप्शन प्लॅन? जाणून घ्या
क्लाउड स्टोरेज आणि फाइल अॅक्सेसमध्ये अडथळे
हे नवीन इमर्जन्सी अपडेट केवळ आउटलुकच नाही, तर वनड्राइव्ह आणि ड्रॉपबॉक्स (Dropbox) सारख्या क्लाउड सेवांशी संबंधित त्रुटींवरही मात करेल. जानेवारीच्या अपडेटनंतर क्लाउडवर आधारित फाइल्स उघडणे किंवा त्या सेव्ह करणे कठीण झाले होते. फाइल्स अॅक्सेस करताना अॅप्स 'फ्रीझ' होणे किंवा एरर मेसेज येण्याचे प्रमाण वाढले होते. या नवीन पॅचमुळे आता क्लाउड फाइल्स वापरताना कोणताही व्यत्यय येणार नाही, असा दावा कंपनीने केला आहे.
सिस्टम रीस्टार्ट होण्याच्या समस्येवरही तोडगा
यापूर्वीही मायक्रोसॉफ्टला अशाच एका आपत्कालीन अपडेटचा आधार घ्यावा लागला होता. काही सिस्टम्समध्ये शटडाउन किंवा हायबरनेशन मोडवर क्लिक करताच पीसी आपोआप पुन्हा सुरू (Restart) होत होता. ही समस्या प्रामुख्याने 'सिक्युअर लाँच' (Secure Launch) फीचर सुरू असलेल्या उपकरणांमध्ये दिसून आली होती, ज्यावर आता उपाय शोधण्यात आला आहे.