Katachi Amti Recipe: होळी म्हटलं की रंग, गोडधोड आणि खास मराठमोळं जेवण ही परंपरा प्रत्येक घरात जपली जाते. या सणाच्या दिवशी महाराष्ट्रात विशेषतः पुरणपोळी बनवण्याची पद्धत आहे. गोड, तुपात मुरलेली गरमागरम पुरणपोळी जेवणाची शोभा वाढवते. पण अनेकांच्या मते पुरणपोळीची खरी चव खुलते ती तिच्यासोबत दिल्या जाणाऱ्या झणझणीत कटाच्या आमटीमुळे. गोड आणि तिखट असा हा भन्नाट संगम ताटात असला की जेवण अधिकच रुचकर होते.
कटाची आमटी ही मुख्यतः पुरणासाठी शिजवलेल्या चणाडाळीच्या पाण्यापासून तयार केली जाते. या पाण्याला ‘येळवणी’ असेही म्हणतात. मराठवाडा भागात विशेष लोकप्रिय असलेली ही आमटी चवीला तिखट, मसालेदार आणि तर्रीदार असते. त्यामुळे ती केवळ पुरणपोळीपुरती मर्यादित न राहता भातासोबतही छान लागते.
ही आमटी बनवण्यासाठी सर्वप्रथम चणाडाळ शिजवल्यानंतर उरलेले पाणी बाजूला ठेवावे. त्यात थोडी डाळ मिसळल्यास आमटीला घट्टपणा आणि छान टेक्स्चर मिळते. पुढील टप्प्यात कांदा आणि खोबरं बारीक चिरून तेलात छान परतून घ्यावं. हलकी सोनेरी रंग येईपर्यंत भाजल्यावर त्याचं मिक्सरमध्ये बारीक वाटण तयार करावं.
हेही वाचा:Quick Puran Poli recipe: पुरणपोळी बनवणं कठीण वाटतंय? या होळीला डाळ न शिजवता, पीठ न मळता बनवा पुरणपोळी; रेसिपी जाणून घ्या
यानंतर कढईत तेल गरम करून त्यात आलं-लसूण पेस्ट टाकावी. सुगंध येऊ लागल्यावर कढीपत्ता आणि काळा मसाला घालून हलक्या आचेवर परतून घ्यावं. मसाल्याची चव खुलण्यासाठी ही प्रक्रिया महत्त्वाची असते. त्यानंतर तयार केलेलं कांदा-खोबऱ्याचं वाटण घालून तेल सुटेपर्यंत चांगलं परतावं.
आता या मिश्रणात येळवणी आणि डाळ मिसळून गरजेनुसार पाणी घालावं. चवीप्रमाणे मीठ टाकून उकळी येऊ द्यावी. एकदा उकळी आली की गॅस मंद करून काही मिनिटे आमटी शिजू द्यावी. शेवटी वरून कोथिंबीर घातल्यास आमटीचा सुगंध आणि चव दोन्ही वाढतात.
हेही वाचा:Ginger Garlic Paste : तुमच्या स्वयंपाकघरात भेसळयुक्त आलं-लसूण पेस्ट तर नाही ना? घरच्या घरी करा 5 सोप्या टेस्ट
कटाची आमटी ही फक्त एक भाजी नसून मराठी सण-उत्सवांची खास ओळख आहे. होळीच्या दिवशी पुरणपोळीबरोबर ही आमटी दिली तर पाहुण्यांचे कौतुक नक्की मिळते. गोड आणि तिखटाचा परिपूर्ण मेळ असलेली ही डिश घरच्या घरी सहज तयार होते आणि संपूर्ण जेवणाला वेगळाच स्वाद देते.
यंदाच्या होळीला पारंपरिक मेन्यूमध्ये या झणझणीत कटाच्या आमटीचा समावेश करून पाहा. एकदा चाखली की तिचा तिखट-तर्रीदार स्वाद पुन्हा पुन्हा आठवेल, इतकी ही चविष्ट आणि खास आहे.