Thursday, November 13, 2025 09:06:00 AM

How To Store Sweets: फ्रीजमध्ये मिठाई ठेवताना लक्षात ठेवा 'ही' सोपी पण महत्वाची गोष्ट

फ्रीजमध्ये मिठाई चुकीच्या पद्धतीने ठेवली तर ती कोरडी व बेस्वाद होते. तज्ज्ञांची सोपी टिप्स वापरून मिठाई 8–10 दिवस ताजी, मऊ आणि स्वादिष्ट राहते.

how to store sweets फ्रीजमध्ये मिठाई ठेवताना लक्षात ठेवा ही सोपी पण महत्वाची गोष्ट

How To Store Sweets: दिवाळीचा सण म्हणजे घराघरात गोडवा पसरलेला! पण सण संपल्यानंतर उरलेली मिठाई काही दिवसांत कोरडी, बेस्वाद किंवा कडक होत असल्याची तक्रार अनेकजण करताना दिसतात. यामागचं मुख्य कारण म्हणजे मिठाई साठवण्याची चुकीची पद्धत. फ्रीजमध्ये ठेवणं म्हणजे सुरक्षित समजलं जातं, पण प्रत्यक्षात याच ठिकाणी सगळ्यात मोठी चूक घडते.

फूड एक्सपर्ट वृंदा दर्याणी यांच्या मते, बहुतांश लोक मिठाईचा डबा थेट फ्रीजमध्ये ठेवतात आणि त्यामुळे त्यातील ओलावा निघून जातो. यामुळे मिठाईचा मऊपणा, चव आणि नैसर्गिक गोडवा कमी होतो. योग्य साठवणूक केल्यास मात्र मिठाई 8 ते 10 दिवस ताजी आणि स्वादिष्ट राहू शकते.

1. डबा थेट फ्रीजमध्ये ठेवू नका
मिठाईचा डबा बाजारातून आणल्यानंतर किंवा घरगुती मिठाई झाल्यानंतर तो थेट फ्रीजमध्ये ठेवू नये. कारण रेफ्रिजरेटरमधील थंड हवा मिठाईचा ओलावा शोषून घेते आणि त्यामुळे ती कोरडी पडते. शिवाय, बाह्य थरावर साखरेचा क्रिस्टल तयार होऊन मिठाईचा टेक्स्चर बदलतो.

2. फॉइल किंवा बटर पेपरचा वापर करा
मिठाई जास्त काळ ताजी ठेवायची असल्यास फॉइल पेपर किंवा बटर पेपर वापरणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. मिठाई ठेवण्यापूर्वी कंटेनरच्या तळाशी फॉइल लावा आणि मिठाईवरही हलकी थर देऊन झाकून ठेवा. यामुळे वरून आणि खालून दोन्हीकडून ओलावा टिकून राहतो आणि मिठाई मऊ राहते.

हेही वाचा:Kitchen Hacks: 'या' 5 सोप्या ट्रिक्स वाचवतील तुमचा वेळ; गृहिणींसाठी लाइफसेव्हिंग किचन हॅक्स

3. हवाबंद कंटेनर निवडा
प्लास्टिकचे साधे डबे टाळा. त्याऐवजी काचेचे किंवा फूड-ग्रेड प्लास्टिकचे हवाबंद कंटेनर वापरा. हे डबे फ्रीजमधील थंड हवा मिठाईपर्यंत पोहोचू देत नाहीत आणि त्यातला नैसर्गिक ओलावा टिकवून ठेवतात.

4. डब्यातील अतिरिक्त हवा काढा (डी-एअर करा)
डबा बंद करण्यापूर्वी झाकण हलके दाबून मध्यभागी दाबा आणि बाजूच्या कड्या उघडून लगेच बंद करा. यामुळे डब्यातील अतिरिक्त हवा बाहेर निघते आणि मिठाई कोरडी होण्याची प्रक्रिया मंदावते. ही छोटेखानी ट्रिक मिठाई ताजी ठेवण्यात मोठी भूमिका बजावते.

हेही वाचा:Yogurt Storage Tips: दही आंबट होणार नाही! वापरा 'या' 5 जबरदस्त स्टोरेज ट्रिक्स

5. प्रत्येक मिठाईसाठी वेगळी काळजी घ्या
सर्व मिठाई एकसारखी ठेवायची नाही. कोरडी बर्फी, लाडू, पेढे यांसारख्या मिठाई हवाबंद कंटेनरमध्ये ठेवून त्यावर फॉइल झाकावं. या मिठाया 8-10 दिवस सहज टिकतात.
रसगुल्ले, गुलाबजाम, खवा किंवा दूधयुक्त मिठाई मात्र त्यांच्या सिरप किंवा रसात ठेवणं आवश्यक आहे. जर मूळ सिरप संपला असेल, तर घरच्या घरी हलका सिरप तयार करून त्यात ठेवले तरी मिठाईची चव कायम राहते.

मिठाई साठवण्याचं शास्त्र साधं आहे. थंडीपासून थोडं संरक्षण द्या आणि ओलावा टिकवा! थेट फ्रीजमध्ये डबा ठेवणं टाळा, हवाबंद कंटेनर आणि फॉइलचा वापर करा. एवढं केलं तरी तुमची दिवाळीची मिठाई 10 दिवसांनंतरही तितकीच मऊ, सुगंधी आणि स्वादिष्ट राहील.


सम्बन्धित सामग्री