Thursday, May 22, 2025 09:11:35 PM

मुले रात्री लवकर झोपत नाहीत? शांत झोपवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या टिप्स

लहान मुले रात्री झोपताना अनेकदा खूप त्रास देतात. मुलांना रोज एकाच वेळी झोपवले नाही तर त्यांच्या झोपण्याच्या सवयींवर परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते.

मुले रात्री लवकर झोपत नाहीत शांत झोपवण्यासाठी फॉलो करा या सोप्या टिप्स

Good Night Tips To Help Children Sleep : रात्री लहान मुलांना झोपवणं हे एक मोठ्ठं काम असतं. अनेकदा मुलं लवकर जेवत नाहीत, झोपत नाहीत. त्यांना झोप आली असली तरी ती काहीही करून झोपणं टाळण्याचे प्रयत्न करतात. अशा परिस्थितीत मुलांना झोपवण्यासाठी एक निश्चित वेळापत्रक बनवा. दररोज एकाच वेळी झोपण्याची आणि उठण्याची सवय लावा.

लहान मुले रात्री झोपताना अनेकदा खूप त्रास देतात. जर मुलांना दररोज एकाच वेळी झोपवले नाही तर त्यांच्या झोपण्याच्या सवयींवर परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत त्यांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागण्याची शक्यता असते. तसेच, रोज रात्री उशिरापर्यंत जागण्याची सवय लहान मुलांसह संपूर्ण कुटुंबासाठी चांगली नाही. पण मुलांना झोपवणं हे अनेक पालकांसाठी रोज एक नवं आव्हान बनतं.

हेही वाचा - Chanakya Niti: पालकांनी आपल्या मुलांचं संगोपन करताना 'या' गोष्टी नक्की लक्षात ठेवाव्या..

रात्री मुलांना झोपण्याची सवय कशी लावायची?
मुलांना रात्री रोजच्या रोज वेळेवर झोपवण्यासाठी काय करायचं? तर, त्यांना झोपण्याच्या साधारण एक तास आधी रात्री जेवण्याची सवय लावा. त्यांना पोटभर जेऊ घाला. जेवल्यानंतर खेळू देण्याचे आमिष दाखवून तुम्ही हे करू शकता.

जेवल्यानंतर एक तास खेळ
यानंतर त्यांना झोपण्यापूर्वी टीव्ही किंवा मोबाईल वापरू देऊ नका. मुलांसोबत स्वतः किंवा घरातील कोणीतरी व्यक्तींनी अगदी बैठे खेळ किंवा एकदम धावपळीचे खेळ न खेळता, साधारण हालचाल होत राहील, अशा प्रकारचे खेळ खेळा. तुम्ही मुलांना संध्याकाळी जेवणानंतर पायी फिरण्याची सवय लावू शकता. बाहेर जाणे शक्य नसल्यास घराच्या गच्चीवर किंवा घरासमोरील रस्त्यावर फिरू शकता. यामुळे मुलांनी जेवलेले थोडेसे पचेल. जेवल्यावर लगेच झोपवू नये. त्यामुळेही झोपमोड होऊ शकते.

बऱ्याचदा जास्त खेळ खेळल्याने किंवा जास्त धावपळीचे खेळ खेळल्याने मुलांचा मेंदू सक्रिय होतो, ज्यामुळे त्यांना रात्री लवकर झोप येत नाही. शिवाय, पोटही दुखू शकते. तेव्हा, हे टाळणे आवश्यक आहे.

यानंतर थोड्याशा गप्पागोष्टी
यानंतर त्यांना गोड बोलून घरी नेऊन एखादी गोष्ट सांगा किंवा गाणं म्हणा किंवा तुम्ही अंगाईगीत देखील गाऊ शकता. त्यांना पुस्तकातील गोष्टी वाचून दाखवा. यामुळे त्यांना झोप येऊ लागेल. तुम्ही रात्री मुलांना प्रेरणादायी कथा त्यांना देवाचे स्तोत्र म्हणून दाखवा. यावेळेस खोलीतील दिवे मंद असावेत. यामुळे त्यांना लवकर आणि चांगली झोप येण्यास मदत होईल. यामुळे त्यांचे विचारही सकारात्मक होतील. यू ट्यूबवर काही lullaby म्हणून गाण्याच्या धून आहेत. या तुम्ही मुलांना झोपण्याच्या वेळी ऐकवू शकता. (स्क्रीनवर दाखवायची नाहीत.. मोबाईल दूर ठेवून मंद आवाजात फक्त ऐकवायची)

झोपण्यापूर्वी शांत वातावरण तयार करा
मुलांना झोपवण्यापूर्वी खोलीतील दिवे मंद करा. टीव्ही, मोबाईल किंवा टॅबलेट सारख्या स्क्रीन कमीत कमी एक तास आधी बंद करा. यामुळे खोलीचे वातावरण शांत आणि आरामदायी होईल आणि तुमचे मूल आरामात झोपू शकेल. 

या कारणांनी होते झोपमोड
शक्यतो मुलांच्या झोपण्याच्या वेळेसोबतच आपलीही झोपण्याची वेळ असावी. या वेळी, घरातील सर्व दिवे बंद करावेत. कारण, जागे राहून कामे करत राहिल्यास किंवा टीव्ही पाहात राहिल्यास आवाजामुळे मुले जागी होऊ शकतात. रात्री किंवा दिवसाही मुले झोपलेली असताना किंवा त्यांना झोपवताना घरातील लोकांनी आपापसांत बोलण्याचा आवाज कमी ठेवावा.

मुलांना दिवसभरात योग्य प्रमाणात पाणी पिण्याची सवय लावावी. मेंदूच्या सर्व कार्यांसाठी पाणी आवश्यक आहे. तेव्हा, दिवसभरात कमी पाणी प्यायल्यास मुले चिडचिडी बनतात.

खाण्यावर नियंत्रण ठेवा
रात्रीच्या खाण्यावर अधिक नियंत्रण ठेवा. काही मुले रात्रीच्या वेळी चॉकलेट किंवा गोड पदार्थ खाण्यासाठी मागतात. अशा परिस्थितीत, त्याचे सेवन केल्याने झोपेत खूप अडथळा येतो. शिवाय, रात्री गोड आणि दातांना चिकटून राहणारे पदार्थ खाल्ल्याने दातही लवकर खराब होतात.

हेही वाचा - कडक उन्हामुळे हैराण झालात? जाणून घ्या, उष्णतेचा मेंदूवर कसा परिणाम होतो आणि 'समर सॅड' म्हणजे काय?

झोपण्याची वेळ निश्चित करा
मुलांना झोपवण्यासाठी एक निश्चित दिनक्रम बनवा. दररोज एकाच वेळी झोपण्याची आणि उठण्याची सवय लावा. खरं तर, नियमित दिनचर्या शरीराचे घड्याळ सेट करते, ज्यामुळे उत्पादकता वाढते आणि अभ्यास करण्याची इच्छा निर्माण होते.

मुलांना सर्दी-खोकला असल्यास नीट झोप लागत नाही
मुलांना सर्दी खोकला असल्यास त्यांना झोपवण्यापूर्वी नाक चांगले शिंकरून साफ करावे. त्यानंतर त्यांना एका उशीवर झोपवावे. त्यांच्या अंगाखाली छातीपासून डोक्यापर्यंत उशी असावी. तसेच, मुलांना सर्दी-खोकला असताना पाठीवर झोपवू नये. तर, कुशीवर वळवून अर्धवट पालथे झोपवावे. यामुळे सारखा खोकला येणार नाही. सर्दी-खोकला झाला असलेल्या लहान बाळांनाही तुम्ही असेच झोपवू शकता.

(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)


सम्बन्धित सामग्री