मुंबई: फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा महिना म्हणून ओळखला जातो. या महिन्याची ओळख ‘व्हॅलेंटाईन डे’मुळे अधिक ठळक होते. 14 फेब्रुवारीला प्रेम व्यक्त करण्यासाठी गुलाबाच्या फुलांना विशेष महत्त्व दिलं जातं. मात्र, यंदा गुलाबाच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे प्रेम व्यक्त करताना प्रेमी युगुलांना खिशाला कात्री बसणार आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.
गेल्या काही महिन्यांपासून हवामानातील बदल, अवकाळी पाऊस आणि उत्पादन खर्च वाढल्याने फुलांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. विशेषतः गुलाबाच्या फुलांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा नुकसान सहन करावं लागलं आहे. त्याचा थेट परिणाम बाजारातील फुलांच्या किमतींवर होणार आहे.
फुलांची विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, यंदा गुलाबाच्या फुलांचे दर नेहमीच्या तुलनेत 20% ते 30 % ने वाढले आहेत. मागणी आणि पुरवठ्यातील तफावतीमुळे पुढील काही दिवसांत किमतींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. व्हॅलेंटाईन डेच्या आदल्या आठवड्यात गुलाबाच्या फुलांना प्रचंड मागणी असते. त्यामुळे फुलांचे दर गगनाला भिडू शकतात.
गुलाब विक्रेत्यांच्या मते, आयात केलेल्या फुलांच्या किमतीही यंदा जास्त आहेत. स्थानिक उत्पादन अपुरे असल्याने आयात केलेल्या फुलांना जास्त मागणी मिळत आहे, पण त्यांच्या किमती सामान्य ग्राहकांसाठी परवडणाऱ्या नसतात. परिणामी, अनेक प्रेमी युगुलांना यंदा आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी गुलाबाशिवाय पर्याय शोधावा लागणार आहे.
दरवर्षी व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने फूल उत्पादक, व्यापारी, आणि विक्रेते मोठ्या प्रमाणावर नफा कमावतात. मात्र, यंदा वाढलेल्या किमतीमुळे ग्राहकांमध्ये नाराजी दिसून येत आहे. काही प्रेमी युगुलांनी गुलाबाच्या ऐवजी अन्य फुलांचा किंवा वेगळ्या भेटवस्तूंचा पर्याय शोधण्याचा विचार करताय कि काय हे पाहून ही महत्वाचं ठरणारे.
यंदाच्या परिस्थितीवर विचार करता, प्रेमी युगुलांसाठी हा व्हॅलेंटाईन डे थोडा महागडा ठरू शकतो. मात्र, प्रेम व्यक्त करण्यासाठी फुलांच्या किमतींवर अवलंबून न राहता आपल्या भावना साध्या पद्धतीने व्यक्त करण्यावर भर द्यावा, असा सल्ला अनेकांनी दिला आहे. व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी फुलांच्या किमतींपलीकडे जाऊन प्रेमाचा खरा अर्थ समजून घेण्याची गरज असल्याचं ही बोललं जातंय.