Thursday, March 20, 2025 04:28:43 AM

Microplastics in Brain: मेंदूत वाढतोय प्लॅस्टिकचा थर! संशोधनातून धक्कादायक खुलासा; मानवी मेंदूत चमचाभर प्लॅस्टिक!

Microplastics in Brain: अभ्यासानुसार, 2016 ते 2024 दरम्यान मानवी मेंदूमध्ये मायक्रोप्लास्टिक पोहोचण्याचे (प्लास्टिकचे अगदी बारीक तुकडे, कण) प्रमाण 50 टक्क्यांनी वाढले आहे. हे अत्यंत धोकादायक आहे.

microplastics in brain मेंदूत वाढतोय प्लॅस्टिकचा थर संशोधनातून धक्कादायक खुलासा मानवी मेंदूत चमचाभर प्लॅस्टिक

Microplastics in Brain: आपल्या आसपास सगळीकडे प्लॅस्टिक आणि मायक्रोप्लास्टिक मोठ्या प्रमाणात आहे. हे प्लॅस्टिक आता हवा, पाणी, अन्न यात मिसळत आहे आणि त्याद्वारे आपल्या शरीराच्या विविध भागांपर्यंत पोहोचले आहे. ते मानवी मेंदूतही जाऊन पोहोचले आहे. दिवसेंदिवस याचे प्रमाण वाढत आहे. नव्या संशोधनातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

आपल्या दैनंदिन जीवनात प्लास्टिकचा वापर खूप वाढला आहे. पाण्याच्या बाटली ते जेवणाचा डबा, युज अॅण्ड थ्रो चहाचे कप, प्लास्टिक वेष्टनातील खाऊ अशा सगळ्याच ठिकाणी प्लास्टिकचा सर्रास वापर होताना दिसतो. आपण वापरलेल्या प्लास्टिकचा कचरा रस्त्यांवर, उद्यानात, शेतात, पाण्यात सगळीकडे दिसून येतो. पण हेच प्लास्टिक आता मानवी शरीरात आणि तेही मेंदूतही पोहोचले आहे. अलीकडेच झालेल्या एका धक्कादायक संशोधनातून हे समोर आले आहे.

हेही वाचा - Control Negative Thoughts : मनात वारंवार नकारात्मक विचार येतायत? मग 'या' सवयी त्वरित बदला

नेचर मेडिसीन जर्नलमध्ये छापून आलेल्या एका नव्या संशोधनानुसार मानवी डोक्यात चमचाभर म्हणजे जवळपास 7 ग्रॅम प्लास्टिक आढळून आले आहे. मृत शरीराच्या डोक्याची तपासणी केल्यानंतर हा धक्कादायक निष्कर्ष समोर आला आहे. डोक्यात आढळून आलेल्या मायक्रोप्लास्टिक आणि नॅनोप्लास्टिकमुळे संशोधकही आता गोंधळून गेले आहेत.हे मायक्रोप्लास्टिक कण आता आपल्या मेंदूत वेगाने जमा होत आहेत, ज्यामुळे न्यूरोलॉजिकल आजारांचा धोका वाढू शकतो.

'नेचर मेडिसिन' मध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासानुसार, 2016 ते 2024 दरम्यान मानवी मेंदूमध्ये मायक्रोप्लास्टिकचे प्रमाण 50 टक्क्यांनी वाढले आहे. या संशोधनाअंतर्गत, 24 मृत लोकांच्या मेंदूच्या ऊतींची चाचणी घेण्यात आली. संशोधकांना असे आढळून आले की, प्रत्येक मेंदूमध्ये सरासरी 7 ग्रॅम मायक्रोप्लास्टिक असते, जे एका सामान्य प्लास्टिकच्या चमच्याच्या वजनाइतके असते.

या अभ्यासाचे प्रमुख शास्त्रज्ञ मॅथ्यू कॅम्पेन म्हणाले की, आपल्या मेंदूत इतक्या मोठ्या प्रमाणात प्लास्टिक असेल अशी मला कधीच अपेक्षा नव्हती. हे आपल्या आरोग्यासाठी खूप चिंताजनक आहे.

डिमेंशियाच्या रुग्णांमध्ये 5 पट जास्त प्लास्टिक
संशोधकांनी डिमेंशियाने ग्रस्त असलेल्या 12 लोकांच्या मेंदूचे विश्लेषण केले तेव्हा सर्वात आश्चर्यकारक गोष्ट समोर आली. त्यांच्यामध्ये इतर व्यक्तींपेक्षा 5 पट जास्त मायक्रोप्लास्टिक असल्याचे आढळून आले. यामुळे अशी भीती निर्माण झाली आहे की, मायक्रोप्लास्टिक आणि अल्झायमर आणि पार्किन्सन सारख्या न्यूरोडीजनरेटिव्ह रोगांदरम्यान जवळचा संबंध असू शकतो.

हेही वाचा - Bike Care Tips : बाईकमधील हा भाग असतो सर्वात नाजूक, छोटीशी चूकही घेऊ शकते जीव!

मेंदूमध्ये इतर अवयवांच्या तुलनेत सर्वाधिक प्लास्टिक
संशोधकांनी पुढे म्हटले की, मेंदूमधील टिश्यूमध्ये यकृत आणि मूत्रपिंडापेक्षाही अधिक प्रमाणात प्लास्टिक आढळून आले आहे. तसेच डिमेंशिया आजाराने ग्रस्त असलेल्या १२ लोकांच्या मेंदूचीही तपासणी करण्यात आली. यामध्ये असे दिसले की, इतर लोकांच्या तुलनेत डिमेंशिया असणाऱ्या लोकांच्या डोक्यात पाच पट अधिक मायक्रोप्लास्टिकचे कण आहेत. यामुळेच आता मायक्रोप्लास्टिक आणि डोक्याशी संबंधित अल्झायमर आणि पार्किसन्स सारख्या आजारांचा सहसंबंध असल्याचा कयास बांधला जात आहे.
 

मायक्रोप्लास्टिक मेंदूपर्यंत कसे पोहोचत आहे?
शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की, मायक्रोप्लास्टिक आपल्या अन्न आणि पाण्याद्वारे आपल्या शरीरात प्रवेश करत आहेत. प्लास्टिकने दूषित झालेलं पाणी, या पाण्याचा वापर करून उगवलेली पिके आणि मांसाहाराने आहारात त्याचे प्रमाण विशेषतः जास्त आढळून आले आहे. याव्यतिरिक्त, असे आढळून आले की पॉलीथिलीन (जे बाटल्या आणि प्लास्टिक कपमध्ये वापरले जाते) मेंदूमध्ये सर्वात जास्त जमा होत होते. संशोधनातून असेही दिसून आले की हे लहान कण रक्त-मेंदू अडथळा (blood brain barrier) पार करून मेंदूत प्रवेश करत आहेत.

हेही वाचा - Raw Garlic Benefits : कच्चा लसूण खाणं ठरेल संजीवनी, दररोज खाल्ल्याने 'या' समस्या होतील दूर

मायक्रोप्लास्टिक म्हणजे काय?
तज्ज्ञांच्या मते, आपण दैनंदिन जीवनात वापरत असलेले पॅकेजिंग, कंटेनर्स, कपडे, टायर आणि इतर वस्तूंच्या अतिशय बारीक कणांना मायक्रोप्लास्टिक आणि नॅनोप्लास्टिक म्हणतात. प्लास्टिकचे हे छोटे कण जगभरातील सर्वच वस्तूंमध्ये दिसून येत असून ते मानवी शरीरात आणि मेंदूतही पोहोचले आहेत.

मायक्रोप्लास्टिकपासून होणारे धोके
मायक्रोप्लास्टिकचे शरीरावर विविध प्रकारचे हानिकारक परिणाम होऊ शकतात, जसे की:
* पेशींना नुकसान पोहोवणे आणि जळजळ निर्माण होणे.
* मेंदूच्या कार्यात अडथळा निर्माण होणे, ज्यामुळे स्मरणशक्ती आणि विचार करण्याची क्षमता कमकुवत होऊ शकते.
* हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक आणि कर्करोग यांसारख्या आजारांचा धोका वाढतो.

मायक्रोप्लास्टिकचा प्रभाव कसा कमी करायचा?
* सिंगल युज (एकदाच वापर करण्याची मर्यादा असलेले) प्लास्टिकचा वापर कमीत कमी करा.
* प्लास्टिकच्या डब्यात अन्न साठवण्याऐवजी काचेची किंवा धातूची भांडी वापरा.
* प्लास्टिकच्या बाटल्यांमधील पाणी पिण्याऐवजी फिल्टर केलेले पाणी वापरा.
* घरात उच्च दर्जाचे एअर फिल्टर आणि धूळमुक्त वातावरण ठेवा.
* जास्त प्रक्रिया केलेले अन्न खाणे टाळा कारण त्यात मायक्रोप्लास्टिकचे प्रमाण जास्त असते.

अस्वीकरण: प्रिय वाचक, ही बातमी लिहिताना आम्ही सामान्य माहितीची मदत घेतली आहे. कोणतीही बाब स्वीकारण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या.


सम्बन्धित सामग्री