Wednesday, April 22, 2026 11:05:00 PM

Satara Zilla Parishad Election: साताऱ्यात पुन्हा राजकीय रणकंदन! काळ्या फिती अन् जोरदार घोषणाबाजी; भाजपविरुद्ध विरोधक एकवटले

या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून भाजपकडे चारही पदे जाण्याची शक्यता आहे. पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवत परिस्थिती नियंत्रणात ठेवली आहे.

satara zilla parishad election साताऱ्यात पुन्हा राजकीय रणकंदन काळ्या फिती अन् जोरदार घोषणाबाजी भाजपविरुद्ध विरोधक एकवटले

सातारा: सातारा जिल्हा परिषदेमध्ये काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीदरम्यान मोठा गोंधळ झाला होता. त्यावेळी मंत्री शंभूराजे देसाई यांना धक्काबुक्की झाल्याचा आरोप झाला होता, ज्यामुळे राज्यभरात वादंग निर्माण झाला होता. तसेच, पोलिसांशी धक्काबुक्की झाल्याच्या प्रकरणात पोलीस अधिकारी तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते.

सध्या हे प्रकरण ताजे असतानाच आता सातारा जिल्हा परिषदेमध्ये सभापती निवडीच्या पार्श्वभूमीवर मोठा राजकीय संघर्ष पुन्हा उफाळून आला आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी या निवडणुकीवर बहिष्कार टाकत जोरदार आंदोलन केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.

या आंदोलनादरम्यान “निषेध असो”, “धिक्कार असो” अशा घोषणा देत जिल्हा परिषद परिसर दणाणून गेला. विरोधी पक्षांकडून भाजपवर नगरसेवक फोडल्याचा आरोप करण्यात आला असून यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.

हेही वाचा: NCP Sunetra Pawar Letter : पत्राचा पेच! निवडणूक आयोगाल दिलेल्या पत्रामुळे पार्थ पवारांची राज्यसभेची खासदारकी अडचणीत?; सुनेत्रा पवार पत्र मागे घेणार?

काळ्या फिती लावून आंदोलन

शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांनी काळ्या फिती लावून जिल्हा परिषद इमारतीच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केले. या घटनेमुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. या संदर्भातील माहिती जय महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी प्रकाश शिंदे यांनी दिली आहे. 

पोलिसांचा बंदोबस्त

सध्याच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. परिस्थिती बिघडू नये म्हणून पोलिसांनी संवेदनशीलपणे परिस्थिती हाताळत गोंधळ नियंत्रणात आणला. सुरक्षेच्या कारणास्तव सदस्यांना मोबाईल आत नेण्यास परवानगी देण्यात आली नाही.

भाजपची आघाडी

दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादीने बहिष्कार टाकल्यामुळे चारही सभापती पदे भाजपकडे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजप सदस्यांनी संयमाची भूमिका घेतली असली तरी पक्षाच्या गोटात समाधानाचे वातावरण असल्याचे दिसत आहे.

एकूणच, सातारा जिल्हा परिषदेमधील हा वाद पुन्हा एकदा चर्चेत आला असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा: Crime News: मुलाच्या हव्यासापोटी पतीचं क्रूर कृत्य; गर्भवती पत्नीसह दोन चिमुरड्यांना स्विमिंग पूलमध्ये बुडवून मारलं


सम्बन्धित सामग्री