Wednesday, February 18, 2026 09:33:28 AM

Nanded-Pune Express: मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांना मोठा धक्का, 'या' कारणामुळे पुणे जंक्शनऐवजी आता 'हडपसर'लाच उतरवावे लागणार

आगामी 26 जानेवारीपासून नांदेड-पुणे एक्स्प्रेससह लातूरहून (हरंगुळ) येणारी स्पेशल ट्रेन आता मुख्य पुणे जंक्शनऐवजी हडपसर स्थानकावरच आपली यात्रा संपवणार आहे.

nanded-pune express मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांना मोठा धक्का या कारणामुळे पुणे जंक्शनऐवजी आता हडपसरलाच उतरवावे लागणार

Nanded-Pune Express: मराठवाड्यातून पुण्याला येणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे. आगामी 26 जानेवारीपासून नांदेड-पुणे एक्स्प्रेससह लातूरहून (हरंगुळ) येणारी स्पेशल ट्रेन आता मुख्य पुणे जंक्शनऐवजी हडपसर स्थानकावरच आपली यात्रा संपवणार आहे. पुणे रेल्वे स्थानकावरील कामामुळे हा बदल करण्यात आला असला, तरी यामुळे विद्यार्थी, नोकरदार आणि ज्येष्ठ नागरिकांचे प्रचंड हाल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

प्रवाशांची कोंडी, पहाटे 4:30 वाजता हडपसरला कसे पोहोचणार?

नांदेड-पुणे एक्स्प्रेस पहाटे 4:30 वाजता हडपसर स्थानकावर पोहोचते. या वेळेत हडपसर परिसरातून शहराच्या मध्यभागात जाण्यासाठी कोणतीही सार्वजनिक बस सेवा (PMPML) उपलब्ध नसते. परिणामी, पिंपरी-चिंचवड, शिवाजीनगर, स्वारगेट किंवा खराडी परिसरात जाणाऱ्या प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागतो, जे अव्वाच्या सव्वा भाडे आकारून प्रवाशांची लूट करतात.

हेही वाचा - Chhatrapati Sambhajinagar : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; पैठणचे माजी नगराध्यक्ष दत्ता गोर्डे यांचा आज भाजप प्रवेश

आंदोलनाचा पवित्रा, रेल्वे संघटना आक्रमक

या निर्णयामुळे मराठवाड्यातील प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. गुजरात आणि उत्तर भारताकडे जाणाऱ्या गाड्यांना पुणे जंक्शनवर जागा मिळते, मग मराठवाड्याच्या गाड्यांनाच का डावलले जाते? असा सवाल रेल्वे प्रवासी संघटनांनी उपस्थित केला आहे. जर रेल्वे प्रशासनाने या गाड्या मुख्य स्टेशनपर्यंत नेण्याची व्यवस्था केली नाही, तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे.

हेही वाचा - Farmer Loan: पीक कर्जाचा ताण कमी होणार? व्याज सवलत, वसुली स्थगितीवर केंद्र सरकारने काय ठरवलं?

निर्णयाचे कारण

पुणे रेल्वे स्थानकावर सध्या विकासकामे सुरू असल्याने काही गाड्यांचे टर्मिनस बदलण्यात आले आहे. यापूर्वीही तत्कालीन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या काळात ही गाडी हडपसरपर्यंतच होती, मात्र प्रवाशांच्या तक्रारींनंतर ती पुन्हा पुणे जंक्शनपर्यंत वाढवण्यात आली होती. आता पुन्हा तोच निर्णय लागू झाल्याने 'जैसे थे' परिस्थिती निर्माण झाली आहे. मराठवाड्यातील प्रवाशांना जेजुरीपासून हरंगुळपर्यंत सोयीसुविधा मिळाव्यात आणि गाड्या थेट पुणे जंक्शनपर्यंत धावल्या पाहिजेत, अशी प्रमुख मागणी आता जोर धरत आहे.
 


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या