Pawar Family Meeting : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात आणि पवार कुटुंबात अत्यंत वेगवान आणि नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहेत. एकीकडे मुंबईत सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीची तयारी सुरू असतानाच, दुसरीकडे बारामतीत शरद पवार यांच्या उपस्थितीत पवार कुटुंबाची एक महत्त्वाची बैठक पार पडत आहे. या बैठकीत पार्थ पवार यांची उपस्थिती सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली आहे.
गोविंद बागेत कौटुंबिक की राजकीय मंथन?
शरद पवार यांच्या 'गोविंद बाग' या निवासस्थानी सकाळपासूनच बैठकांचे सत्र सुरू आहे. या बैठकीला सुरुवातीला खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, युगेंद्र पवार आणि राजेंद्र पवार उपस्थित होते. मात्र, काही वेळापूर्वीच पार्थ पवार गोविंद बागेत पोहोचल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अजितदादांच्या निधनानंतर दोन्ही गटांतील अंतर कमी करण्यासाठी पार्थ पवार पुढाकार घेत आहेत का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
विलिनीकरणाचा पेच सुटणार?
दिवंगत अजित पवार हे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी आग्रही होते आणि त्यासाठी त्यांनी अनेक पावलेही उचलली होती. मात्र, त्यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी थेट मुंबई गाठून उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याचा निर्णय घेतल्याने विलिनीकरणाच्या चर्चेला खीळ बसल्याचे बोलले जात होते. अशा परिस्थितीत पार्थ पवार यांनी शरद पवारांची भेट घेणे, हा विलिनीकरणाच्या दृष्टीने एखादा 'मध्यममार्ग' काढण्याचा प्रयत्न असू शकतो, असे संकेत मिळत आहेत.
हेही वाचा - Ajit Pawar Death: ‘हा अपघात नाही, हे षडयंत्र आहे…’ अजित पवारांच्या मृत्यूबाबत कोणी केला धक्कादायक दावा?
शरद पवारांची भूमिका
आज सकाळी मुंबईत बोलताना शरद पवार यांनी सुनेत्रा पवारांच्या शपथविधीबाबत आपल्याला काहीच कल्पना नसल्याचे सांगत हा त्यांच्या पक्षाचा (अजित पवार गट) अंतर्गत निर्णय असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, कौटुंबिक पातळीवर पार्थ पवारांशी होत असलेली ही चर्चा राजकीय मतभेद बाजूला ठेवून पक्षाचे भविष्य ठरवण्यासाठी महत्त्वाची मानली जात आहे.