मुंबई: राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा तापलेले वातावरण पाहायला मिळत आहे. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ट्विट करत सरकारवर निशाणा साधला असून, एका व्हिडिओचा उल्लेख करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना थेट प्रश्न विचारला आहे. "या सरकारकडे फक्त शेतकरी कर्जमाफीला पैसा नाही.बाकी सगळं ओक्के आहे! जनतेला जरा सांगा मुख्यमंत्री फडणवीस आणि शिंदे जी, हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत?" असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला.
या आरोपांवर शिवसेना (शिंदे गट) चे आमदार महेंद्र दळवी यांनी तात्काळ प्रतिक्रिया देत दानवे यांच्यावरच पलटवार केला. जय महाराष्ट्र न्यूजसोबत बोलताना दळवी म्हणाले की, “अंबादास दानवे यांना ब्लॅकमेलिंग करण्याशिवाय दुसरे कोणतेही काम उरलेले नाही.” त्यांनी दानवे यांना खुले आव्हान देत व्हिडिओतील व्यक्तींची ओळख, पुरावे आणि संपूर्ण माहिती सार्वजनिक करण्याची मागणी केली.
हेही वाचा: Santosh Deshmukh Case : क्रूरतेचा कळस, अमानुषतेची परिसीमा गाठणाऱ्या निर्घृणतेची वर्षपूर्ती; संतोष देशमुखला न्याय कधी?, कुटुंबिय प्रतिक्षेत
दळवींनी पुढे आरोप करत सांगितले की, “दानवे यांची पक्षामध्ये किंमत उरलेली नाही आणि त्यामुळे ते असे प्रकार करून राजकीय लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहेत.” व्हिडिओमध्ये ज्याचा चेहरा दिसत नाही, त्यावरून आरोप करणे म्हणजे जनतेची दिशाभूल करणे असल्याचे ते म्हणाले. तसेच या प्रकरणाला कोणताही आधार नसल्याचेही दळवी यांनी स्पष्ट केले. सध्या ते प्रवासात असल्याचे सांगत दळवी म्हणाले की या मुद्द्यावर सोशल मीडियावर कोणतीही प्रतिक्रिया त्यांनी दिलेली नाही. “अशा व्यक्तीला काय उत्तर द्यावे? आज अधिवेशनात मी हा विषय थेट सभागृहात मांडणार आहे,” असे त्यांनी जाहीर केले.
दळवी यांनी दानवे यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर टीका करत “विरोधी पक्षनेते दानवे यांचा हा हल्लीचा धंदा झाला आहे,” असेही वक्तव्य केले. दळवी यांनी शेवटी सांगितले की, या प्रकरणाविषयीचे आपले अधिकृत मत ते विधानसभेत मांडणार असून, त्यानंतरच ते माध्यमांत पोहोचवले जाईल. या आरोप-प्रत्यारोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरणात आणखी एक नवीन मुद्दा निर्माण झाला आहे.
हेही वाचा: Goa Club Fire Incident: गोवा आग दुर्घटनेतील क्लब मालक थायलंडला फरार, फुकेतमध्ये असल्याची माहिती समोर