अमरावती : अमरावती जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या वाढत्या मृत्यूंची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. गेल्या 40 दिवसांत जिल्ह्यातील 26 शेतकऱ्यांनी जीवन संपवल्याची माहिती आहे. यामध्ये सप्टेंबर महिन्यातील २८, तर ऑक्टोबरच्या पहिल्या नऊ दिवसांतील आठ शेतकऱ्यांचा समावेश आहे. या घटनांमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या गंभीर परिस्थितीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
यंदाच्या खरीप हंगामात अमरावती जिल्ह्यात 44 टक्के पावसाची तूट नोंदवण्यात आली आहे. कमी पाऊस, पिकांची नापिकी आणि दुष्काळसदृश परिस्थितीमुळे शेतकऱ्यांसमोर मोठं आर्थिक संकट उभं राहिलं आहे. शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
त्यातच बँकांकडून घेतलेलं कर्ज, खासगी सावकारांची देणी आणि मुला-मुलींच्या लग्नाची जबाबदारी यामुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण वाढत असल्याचं चित्र आहे. शेतीत नुकसान झाल्यानंतर कर्जाची परतफेड कशी करायची, असा प्रश्न अनेक कुटुंबांसमोर निर्माण झाला आहे.
या पार्श्वभूमीवर संकटग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत मिळावी, अशी मागणी होत आहे. पीक नुकसानीचे सर्वेक्षण, नुकसानभरपाई, कर्जविषयक मदत आणि मानसिक आधार उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने प्रभावी पावलं उचलण्याची गरज आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी वेळेत ओळखून त्यांना मदत मिळणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.