अमरावती: अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वेजवळ समृद्धी महामार्गावर ट्रक आणि टेम्पो पिकअप यांच्यात भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात 7 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची, तर 18 जण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक 97 जवळ हा भीषण अपघात घडला.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, काही भाविक शेगाव येथून दुर्गादेवी घेऊन वर्धा येथे जात होते. याच प्रवासादरम्यान धामणगाव रेल्वेजवळ चॅनल क्रमांक 97 येथे त्यांच्या वाहनाची ट्रकसोबत धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, या अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 18 जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या भीषण अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये घनश्याम पाटील, प्रविण बकाणे, गोलू बादलगवार, ओम गावडे, दताजी खुरसगे, रोशन राऊत आणि मुनेश्वर ढोले यांचा समावेश आहे.
जखमींना तातडीने रुग्णालयात हलवले
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. धामणगाव रेल्वे येथील स्थानिक नागरिक आणि पत्रकारांच्या सतर्कतेमुळे जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यासाठी मदत झाली. अपघातातील जखमींना तातडीने धामणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गंभीर जखमींवर उपचार सुरू असून, त्यांच्या प्रकृतीबाबत अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही.
पोलीस अधीक्षकांसह नगराध्यक्ष रुग्णालयात दाखल
या भीषण अपघाताची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी परिस्थितीची माहिती घेतली. तसेच धामणगावच्या नगराध्यक्ष अर्चना रोठे यादेखील रुग्णालयात दाखल झाल्या. त्यांनी अपघातातील जखमींची माहिती घेतली.
दरम्यान, अपघात नेमका कशामुळे झाला, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. ट्रक आणि टेम्पो पिकअप यांच्यातील धडकेमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अपघातामुळे समृद्धी महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला का, याबाबतही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.