Saturday, March 07, 2026 03:03:15 AM

BMC Politics: विधीमंडळात संघर्ष, पण पालिकेत 'गळाभेट'; ठाकरेंच्या बड्या नेत्याचा मुलगा शिंदेंच्या आमदाराच्या भेटीला

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बदलत्या राजकीय समीकरणांचे संकेत मानले जात आहेत.

bmc politics विधीमंडळात संघर्ष पण पालिकेत गळाभेट ठाकरेंच्या बड्या नेत्याचा मुलगा शिंदेंच्या आमदाराच्या भेटीला

मुंबई: एकीकडे राज्याच्या विधीमंडळात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर तुटून पडत असताना, दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेच्या गोटात अशा काही हालचाली घडल्या आहेत ज्याने संपूर्ण राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चांनी आधीच वातावरण तापलेले असताना, ठाकरे गटाचे निष्ठावंत आणि विधानसभा प्रतोद सुनील प्रभू यांचे सुपुत्र अंकित प्रभू यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांची भेट घेतली. ही केवळ 'सदिच्छा भेट' आहे की आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बदलत्या समीकरणांची नांदी, यावर आता तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

मुंबई महानगरपालिकेत पाच स्वीकृत नगरसेवकांच्या नियुक्तीची प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आहे. याच प्रक्रियेच्या रणधुमाळीत आज एक अनपेक्षित चित्र पाहायला मिळाले. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अंकित प्रभू यांनी शिंदे गटाच्या महापालिकेतील पक्ष कार्यालयात जाऊन आमदार प्रकाश सुर्वे यांची भेट घेतली. विशेष म्हणजे, ज्यावेळी दोन्ही शिवसेनेत कट्टर वरोध असताना, अशा काळात प्रभूंसारख्या कट्टर घराण्यातील वारसदाराने प्रतिस्पर्धी गटाच्या कार्यालयात पाऊल ठेवणे, ही साधी घटना मानली जात नाही.

या भेटीचे तात्कालिक कारण 'शुभेच्छा' असल्याचे सांगितले जात आहे. शिंदे गटाकडून स्वीकृत नगरसेवक पदासाठी प्रकाश सुर्वे यांचे पुत्र राज सुर्वे यांचे नाव जवळपास निश्चित मानले जात आहे. याच पार्श्वभूमीवर अंकित प्रभू यांनी राज सुर्वे यांच्या संभाव्य नियुक्तीबद्दल त्यांचे वडील प्रकाश सुर्वे यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. "राजकारणात मतभेद असावेत, मनभेद नसावेत" या उक्तीचा प्रत्यय या भेटीतून येत असला, तरी राजकीय विश्लेषकांच्या मते, या भेटीमागे खोलवर दडलेली काही वेगळीच राजकीय गणिते असू शकतात.

हेही वाचा: New Pension Rules: EPFO चा मोठा निर्णय, 12 वर्षांनंतर जुना नियम पुन्हा लागू; तुमच्या पगारावर काय होणार परिणाम? वाचा

अंकित प्रभू हे पहिल्यांदाच मुंबई महापालिकेवर निवडून गेले होते आणि त्यांच्याकडे ठाकरे गटाचा एक तरुण व उमदा चेहरा म्हणून पाहिले जाते. त्यांचे वडील सुनील प्रभू हे उद्धव ठाकरेंचे अत्यंत विश्वासू मानले जातात. अशा परिस्थितीत अंकित प्रभू यांनी थेट शिंदे गटाच्या तंबूत जाऊन हजेरी लावल्याने, ठाकरे गटात 'बंडाचे वारे' वाहणार की काय, अशी चर्चा आता दबक्या आवाजात सुरू झाली आहे. 'अतिथी देवो भव'च्या संस्कृतीत या भेटीला कितीही सौम्य स्वरूप दिले तरी, निवडणुकीच्या उंबरठ्यावर असलेल्या मुंबईसाठी ही भेट सूचक मानली जात आहे.

मुंबईवर वर्चस्व राखण्यासाठी 'एक-एक मोहरा' महत्त्वाचा असताना, ठाकरेंचा हा तरुण मोहरा शिंदेंच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगणे, हे महाविकास आघाडीसाठी चिंतेचे कारण ठरू शकते. त्यातच प्रकाश सुर्वे यांच्या कार्यालयात झालेली ही भेट म्हणजे भविष्यातील मोठ्या राजकीय भूकंपाची पूर्वतयारी तर नाही ना? असा प्रश्न विचारला जात आहे.

शेवटी, राजकारणात "दिसतं तसं नसतं" आणि म्हणूनच कदाचित या भेटीचा अर्थ केवळ शुभेच्छांपुरता मर्यादित नसावा. विधीमंडळाच्या अधिवेशनामुळे राज्याचे लक्ष मुंबईच्या विधानभवनाकडे असताना, महापालिकेतील या 'हाय व्होल्टेज' घडामोडीने मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आता आगामी काळात अंकित प्रभू त्यांच्या भूमिकेवर ठाम राहतात की ही भेट खरोखरच एका नव्या राजकीय प्रवासाची सुरुवात ठरते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

हेही वाचा: Jitendra Awhad On Plain Crash: अजित पवारांचा विमान अपघात की 'नियोजित' घातपात? ब्लॅक बॉक्सवरून जितेंद्र आव्हाडांनी उपस्थित केले खळबळजनक सवाल


सम्बन्धित सामग्री