Sunday, February 08, 2026 07:24:01 AM

Ajit Pawar Plane Crash: अजितदादांच्या विमानाचा अपघात कसा झाला? प्रत्यक्षदर्शीने सांगितला घटनाक्रम

अपघातानंतर काही क्षणांतच विमानाने पेट घेतला. “बघता बघता विमान कोसळले आणि आगीच्या भक्षस्थानी पडले. आम्ही ते दृश्य प्रत्यक्ष पाहिले,” असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

ajit pawar plane crash अजितदादांच्या विमानाचा अपघात कसा झाला प्रत्यक्षदर्शीने सांगितला घटनाक्रम

मुंबई: महाराष्ट्रावर शोककळा पसरवणारी मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा बारामतीतील गोदापाली परिसरात अपघात झाला असून, या दुर्घटनेत त्यांचे निधन झाल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे. सकाळी सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास लँडिंगदरम्यान विमानाला अपघात झाल्याची माहिती आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चार्टर्ड विमानाचा लँडिंगदरम्यान अपघात नेमका कसा झाला याची प्राथमिक माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. या घटनेमुळे बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, सकाळी सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास अजित पवार विमानात बसले होते. हे विमान बारामती विमानतळावर उतरण्याच्या प्रक्रियेत असताना वैमानिकाचे विमानावरील नियंत्रण सुटल्याचे सांगण्यात येत आहे. धावपट्टीवर सुरक्षित लँडिंग होण्याऐवजी विमान थेट शेतजमिनीत जाऊन जोरात आपटले.

अपघातानंतर काही क्षणांतच विमानाने पेट घेतला. “बघता बघता विमान कोसळले आणि आगीच्या भक्षस्थानी पडले. आम्ही ते दृश्य प्रत्यक्ष पाहिले,” असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. आग भीषण असल्यामुळे उपस्थित नागरिकांनी वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र परिस्थिती हाताबाहेर गेल्याने कोणतीही मदत करणे शक्य झाले नाही.

घटनेची माहिती मिळताच बचाव पथक, अग्निशमन दल आणि संबंधित यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. परिसर सुरक्षित करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

बारामतीकरांचे अजित पवार यांच्यावर विशेष प्रेम होते. हा प्रसंग सांगताना अनेक नागरिकांना अश्रू अनावर झाले. बारामतीसह राज्यभरात दुःखाची लाट पसरली असून, एक धडाडीचा, कार्यक्षम आणि जनतेशी थेट नातं असलेला नेता गमावल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा: Ajit Pawar Plane Crash: अजित पवार ज्या विमानाने प्रवास करत होते ते कोणत्या कंपनीचे? याआधीही झाला होता अपघात


सम्बन्धित सामग्री





ताज्या बातम्या




ताज्या बातम्या