डोंबिवली: पहाटेच्या साखरझोपेत असलेल्या डोंबिवलीकरांसाठी आजची पहाट भयावह स्वप्न ठरली. सागाव परिसरातील चेडा नगरमध्ये एका इमारतीच्या बेसमेंटमध्ये लागलेल्या भीषण आगीने अक्षरशः रौद्र रूप धारण केले होते. या अग्नितांडवात पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या 29 दुचाकी जळून खाक झाल्या असून, आगीच्या धुरामुळे गुदमरल्याने आणि धावपळीत पाच रहिवासी जखमी झाले आहेत. या घटनेने संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे.
डोंबिवली पूर्वेकडील सागाव, चेडा नगर भागातील जय भारत स्कूलजवळ 'रविकिरण सोसायटी' (राज अपार्टमेंट) ही इमारत आहे. रविवारी पहाटे चार वाजून 15 मिनिटांच्या सुमारास, जेव्हा सर्व रहिवासी गाढ झोपेत होते, तेव्हा इमारतीच्या बेसमेंटमधील मोटरसायकल पार्किंगमध्ये अचानक ठिणगी पडली. काही क्षणांतच या ठिणगीने भीषण आगीचे रूप घेतले. आगीचा भडका इतका मोठा होता की, काही वेळातच संपूर्ण बेसमेंट धुराच्या लोटांनी वेढले गेले आणि तेथे उभ्या असलेल्या दुचाकींनी एकामागून एक पेट घेतला.
हेही वाचा: Jayant Patil: राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाला 'खो'; सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांचा आक्षेप; विलीनीकरणाचा अध्याय तूर्तास बंद?
या दुर्घटनेत रहिवाशांच्या कष्टाची कमाई असलेल्या 29 दुचाकींचा अक्षरशः कोळसा झाला आहे. आगीच्या ज्वाळा आणि इमारतीत साचलेल्या काळ्याकुट्ट धुरामुळे रहिवाशांचा श्वास गुदमरू लागला. जीव वाचवण्यासाठी रहिवासी सैरावैरा धावू लागले, ज्यामुळे इमारतीत एकच गोंधळ उडाला. या धावपळीत आणि आगीच्या झळा लागल्याने पाच जण जखमी झाले आहेत. जखमींवर तात्काळ नजीकच्या 'ऑप्टिलाईट हॉस्पिटल'मध्ये उपचार सुरू करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जवानांनी जीवाची बाजी लावून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आग इमारतीच्या वरील मजल्यांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच विझवण्यात यश आले, अन्यथा मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती. पहाटेच्या शांततेत अचानक उद्भवलेल्या या संकटामुळे नागरिक प्रचंड भयभीत झाले असून, अनेक तास इमारतीबाहेर मोकळ्या मैदानात उभे होते.
आगीचे नेमके कारण अद्याप 'गुलदस्त्यात' असले तरी, प्राथमिक अंदाजानुसार बेसमेंटमधील इलेक्ट्रिक वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून घटनेचा पंचनामा सुरू आहे. या घटनेने इमारतींमधील पार्किंगमधील सुरक्षिततेचा आणि फायर ऑडिटचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
हेही वाचा: Mhada House Payment Rule: मुंबईकरांसाठी गुड न्यूज; म्हाडाच्या घरासाठी आता एकाच वेळी पैसे भरण्याची कटकट संपली, पाहा काय आहे नवा नियम?