मुंबई महापालिकेच्या शाळांचा चेहरामोहरा बदलण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत आर्थिक वर्ष 2026-27 साठी शिक्षण विभागाचा तब्बल 4248.08 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. शिक्षण केवळ पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांना डिजिटल, सुरक्षित आणि कौशल्याधारित भविष्याची तयारी करून देण्यावर यंदाच्या अर्थसंकल्पात विशेष भर देण्यात आला आहे. तब्बल पाच वर्षांनंतर नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत सादर झालेल्या या अर्थसंकल्पातून पालिका शिक्षण व्यवस्थेला आधुनिकतेची नवी दिशा देण्याचा प्रयत्न दिसून येतो. अतिरिक्त आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी शिक्षण समिती अध्यक्षा राजेश्री शिरवडकर यांच्याकडे हा अर्थसंकल्प सादर केला.
शालेय पायाभूत सुविधांच्या विकासावरही मोठा भर देण्यात आला आहे. नवीन शाळा इमारतींची 57 कामे पूर्ण करण्यात येणार असून उर्वरित 15 कामे यावर्षात पूर्ण करण्यासाठी 340 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच 569 शालेय इमारतींच्या देखभालीसाठी 180.27 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळांमध्ये CCTV बसविण्यासाठी 42 कोटी रुपये खर्च केले जाणार असून अत्याधुनिक बैठक व्यवस्थेसाठी 34.28 कोटी रुपयांचा निधी राखून ठेवण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना BEST बसमधून मोफत प्रवासासाठी 8.70 कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला केंद्रस्थानी ठेवत शालेय मोफत शैक्षणिक साहित्याकरिता 187.57 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून डिजिटल शिक्षणाला चालना देण्यासाठी प्राथमिक शाळांसाठी 23.38 कोटी आणि माध्यमिक शाळांसाठी 1.08 कोटी रुपयांत डिजिटल क्लासरूम उभारण्यात येणार आहेत. इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व वाढवण्यासाठी इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी 278 इंग्रजी भाषा प्रयोगशाळा सुरू करण्यात येणार असून यासाठी 3.87 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच विज्ञान विषयाची आवड निर्माण करण्यासाठी दोन शाळांमध्ये विज्ञान पार्क उभारण्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
हेही वाचा: Delhi City Name Change: केरळ पाठोपाठ दिल्लीचे नाव बदलणार? खासदाराने थेट अमित शाहांना लिहिलं पत्र; काय सुचवलंय नवं नाव?
तंत्रज्ञानाच्या युगात विद्यार्थ्यांना सुरक्षित डिजिटल वापराचे ज्ञान मिळावे यासाठी सुमारे 20 हजार विद्यार्थ्यांना सायबर साक्षरता प्रशिक्षण दिले जाणार असून प्राथमिक व माध्यमिक शाळांसाठी प्रत्येकी 11.80 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यासोबतच विद्यार्थ्यांना सुरक्षा कायदे, POCSO कायद्याची माहिती, तसेच ड्रग्ज आणि व्यसनाधीनतेच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती सत्रांचे आयोजन करण्यात येणार आहे. गणित विषयाची भीती दूर करण्यासाठी ‘गणित गुरुवार’ उपक्रम राबविण्यात येणार असून खान अकॅडमीच्या माध्यमातून गणित आणि विज्ञान सरावालाही प्रोत्साहन दिले जाणार आहे.
यंदाच्या अर्थसंकल्पात गुणवंत विद्यार्थ्यांना विशेष प्रोत्साहन देण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. इयत्ता 10 वीमध्ये 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या मुंबईतील पहिल्या 25 विद्यार्थ्यांचा पदवीपर्यंतचा शैक्षणिक खर्च महापालिका उचलणार आहे. याशिवाय ग्रंथालय अद्ययावतीकरणासाठी पाच कोटी, संगीत साहित्य खरेदीसाठी 36 कोटी, ‘इको वॉरियर्स’ पर्यावरण उपक्रमासाठी 2.40 कोटी, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी थेरपी साहित्य, सांघिक खेळ सुविधा आणि कलेच्या प्रशिक्षणासाठी तीन आर्ट एक्सलेंस सेंटर उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अंधेरी पूर्व येथे नवीन CBSE शाळा सुरू करण्याची घोषणाही या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे.
एकूणच, पारंपरिक शिक्षणपद्धतीपासून कौशल्याधारित आणि तंत्रज्ञानस्नेही शिक्षणव्यवस्थेकडे वाटचाल करण्याचा स्पष्ट संदेश या अर्थसंकल्पातून मिळतो. “शिक्षणात गुंतवणूक म्हणजे भविष्याची उभारणी” या विचाराला प्रत्यक्ष आकार देत मुंबई महापालिकेने शालेय शिक्षण अधिक सक्षम, सुरक्षित आणि स्पर्धात्मक करण्याचा प्रयत्न केल्याचे या अर्थसंकल्पातून अधोरेखित झाले आहे.
हेही वाचा: Amalaki Ekadashi 2026: आरोग्याचं 'अमृत' अन् भक्तीचा संगम; आमलकी एकादशीला आवळ्याची पूजा का करतात? वाचा