State Election Commission:महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदान प्रक्रियेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मतदान केल्यानंतर बोटावर लावली जाणारी शाई काही वेळात पुसली जाते, असे दावे करत अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी समोर येत या आरोपांचे खंडन केले असून, निवडणूक प्रक्रियेबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात असल्याचे स्पष्ट केले आहे.
राज्य निवडणूक आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिका निवडणुकांमध्ये वापरली जाणारी शाई ही केंद्र सरकारच्या निवडणूक आयोगाकडून वापरली जाणारीच आहे. ही शाई सहजपणे काढता येत नाही, असा त्यांचा ठाम दावा आहे. “मतदान केल्यानंतर पुन्हा मतदान करण्याचा प्रयत्न कोणी केल्यास, मतदान केंद्रावरील अधिकारी त्याची त्वरित दखल घेतील आणि नियमानुसार कारवाई केली जाईल,” असेही त्यांनी सांगितले.
दिनेश वाघमारे यांनी स्पष्ट केले की, बोटावर लावली जाणारी शाई ही विशेष प्रकारच्या मार्कर पेनद्वारे लावली जाते. शाई पूर्णपणे वाळल्यानंतर ती पुसली जात नाही. “२०११ पासून आम्ही एकाच कंपनीचे मार्कर पेन वापरत आहोत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांदरम्यानही अशाच प्रकारच्या तक्रारी समोर आल्या होत्या, मात्र त्यात तथ्य आढळले नाही,” असे त्यांनी नमूद केले. त्यामुळे सध्या पसरवले जात असलेले व्हिडिओ आणि दावे हे नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण करणारे असल्याचे त्यांनी सूचित केले.

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी निवडणूक प्रक्रियेवर गंभीर आरोप करत वादाला आणखी धार दिली आहे. त्यांनी सध्याची निवडणूक यंत्रणा ही सत्ताधाऱ्यांच्या फायद्यासाठी आणि विरोधकांना संपवण्यासाठी काम करत असल्याचा आरोप केला. दुबार मतदारांच्या मुद्द्यावर प्रशासनाने आधी नकार दिला, मात्र नंतर स्वतःच दुबार मतदारांची यादी जाहीर केली, असे सांगत त्यांनी संपूर्ण प्रक्रियेलाच ‘फ्रॉड’ ठरवले.
राज ठाकरे यांनी शाईऐवजी पेन वापरण्यावरही आक्षेप घेतला. “आज निवडणुकीत वेगळेच चित्र दिसत आहे. शाईऐवजी पेन वापरले जात असून, त्याची शाई पुसली जात असल्याचे दिसते. ही लोकशाहीसाठी चांगली लक्षणे नाहीत,” असे त्यांनी म्हटले. अशा पद्धतीने सत्तेचा गैरवापर करून मिळवलेला विजय हा खरा विजय ठरत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय, मतमोजणीदरम्यान वापरण्यात येणाऱ्या यंत्रांबाबतही राज ठाकरे यांनी शंका उपस्थित केली. ही यंत्रणा कोणत्याही राजकीय पक्षाला आधी दाखवली गेली नसल्याचा आरोप करत, पारदर्शकतेचा अभाव असल्याचे त्यांनी सांगितले.
एकीकडे राज्य निवडणूक आयोग निवडणूक प्रक्रिया सुरक्षित आणि पारदर्शक असल्याचा दावा करत असताना, दुसरीकडे राजकीय आरोप-प्रत्यारोपांमुळे मतदान प्रक्रियेवरील विश्वासाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. या वादामुळे नागरिकांमध्ये संभ्रम वाढत असून, निवडणूक आयोगासमोर विश्वास पुनर्स्थापित करण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.